राज्यात सध्या सुरू असलेल्या गारपिटीतून सावरण्यापूर्वीच हवामानतज्ज्ञांनी आणखी एक धास्ती व्यक्त केली आहे. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि सध्या सुरू असलेली भयंकर गारपीट हे त्याचेच निदर्शक आहे.
राज्याच्या बहुतांश भागाला सध्या गारपिटीचा तडाखा बसला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश तसेच, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटक या भागातही गारांचा कहर अनुभवायला मिळाला. या आपत्तीस वाऱ्यांचे प्रवाह कारणीभूत आहेत. गारपिटीचा कहर या आठवडय़ात संपणार असला, तरी त्यानंतर हवामानाबाबतची चिंता कमी झालेली नसेल. कारण या वर्षीच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस असण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुण्यातील नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी सविस्तर माहिती दिली.
याबाबत जागतिक पातळीवर व भारतातही संशोधन झाले आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल-निनो हा घटक आणि पावसाळ्यापूर्वी घडणारा वादळी पाऊस-गारपीट या आपत्ती यांच्यात काही संबंध आहे का, याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात असे आढळून आले आहे की, एल-निनोचा प्रभाव असणाऱ्या वर्षी आधी एप्रिल महिन्यात वादळी पाऊस-गारपीट यांची तीव्रता अधिक असते. यापूर्वी उद्भवलेल्या एल-निनो वर्षांमध्ये हे पाहायला मिळाले आहे. अलीकडे १९९७ मध्ये अतिशय प्रभावी एल-निनो असतानाही हे पाहायला मिळाले होते. आता तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच असे घडले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसावर हे सावट असण्याची शक्यता आहे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले. या वर्षीचे वेगळेपण एवढेच, की या वेळी एप्रिलऐवजी मार्च महिन्यातच असा प्रकार घडला आहे. त्यामुळे नेमके काय घडणार याबाबत उत्सुकता आहे, असेही ते म्हणाले.
याचबरोबर इतरही हवामानतज्ज्ञांनी यावर्षीच्या पावसाळ्यावर एल-निनोचे सावट असण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या वर्षीचा पावसाळा कसा असेल, यावर सर्वाचेच लक्ष आहे.
 
गारपिटीपासून गुरुवार-शुक्रवारनंतर सुटका!
सध्या सुरू असलेल्या गारपिटीपासून राज्याची येत्या गुरुवार-शुक्रवारनंतर सुटका होण्याची शक्यता आहे. सध्याची हवामानाची स्थिती या दोन-तीन दिवसांत बदलणार आहे. त्यानंतर गारपीट थांबेल आणि तापमानात वाढ व्हायला सुरुवात होईल, असे पुणे वेधशाळेच्या अधिकारी डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले.

Story img Loader