लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, घरकुल, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापोडी आदी भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने यंदा महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामाला फेब्रुवारीपासूनच सुरुवात केली. आतापर्यंत ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. हे काम महिनाअखेर पूर्ण झाल्यानंतर मोठ्या नाल्यांची पुन्हा सफाई करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दोन ते ११ मीटर रुंदीचे एकूण १०० किलोमीटर अंतराचे १४३ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक जण घरगुती कचरा नाल्यांमध्ये टाकतात. या नाल्यांत गाळ साचल्याने नाले अरुंद होतात. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दर वर्षी सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, चेंबर आणि गटारे स्वच्छ केली जातात.
गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, घरकुल, रुपीनगर, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापोडीसह आदी भागांत पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे संबंधित कुटुंबांचे स्थलांतर करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने २० फेब्रुवारीपासूनच नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत नालेसफाईचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा लवकर काम हाती घेतल्याने एप्रिलअखेर नालेसफाई पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे.
दर आठवड्याला आढावा
आयुक्त शेखर सिंह नालेसफाईच्या कामाचा दर आठवड्याला आढावा घेत आहेत. स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर दर मंगळवारी आयुक्त सिंह प्रत्येक नाल्याची माहिती घेतात. नालेसफाईत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
शहरातील नालेसफाईच्या कामाला यंदा लवकरच सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. नालेसफाईपूर्वी व नंतर छायाचित्रे घेतली जात आहेत. मोठे नाले दुसऱ्यांदा साफ करण्याचे नियोजन आहे. -सचिन पवार, उपायुक्त,आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका