खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अवघ्या ११ दिवसांत धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. टेमघर धरणात ३५ टक्के, पानशेत आणि वरसगाव धरणांत अनुक्रमे ४७ टक्के आणि ५० टक्के, तर खडकवासला धरण यापूर्वीच १०० टक्के भरले आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरल्याने या धरणातून गुरुवारी सायंकाळी ४७०८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणात सध्या १४.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५०.३५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये १.४७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमधील पाणीसाठा १३.२१ टीएमसी होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये तब्बल ५.६० टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. खडकवासला धरणातून बुधवारी रात्रीपर्यंत १३ हजार १३८ क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते. मात्र, या धरणातील पाऊस काहीसा कमी झाल्याने गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ४७०८ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले आणि हा विसर्ग रात्री उशीरापर्यंत कायम होता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बु‌धवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात १३२ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे १२९ मि.मी. आणि १२८ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात ५४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गुरुवारी दिवसभरात टेमघर धरण परिसरात ३० मि.मी., वरसगाव धरणक्षेत्रात २१ मि.मी., पानशेत धरण परिसरात २५ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात अवघा पाच मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये

टेमघर १.२९ ३४.८६

वरसगाव ६.०७ ४७.३७

पानशेत ५.३४ ५०.१४

खडकवासला १.९७ १००

एकूण १४.६८ ५०.३५

पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण सोमवारी (११ जुलै) पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे या धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, तर नदीपात्रातून गुरुवारी ४७०८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहून रात्री उशिरा विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येणार आहे. मात्र, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडाळकर यांनी केले आहे.