‘‘भारताच्या सहकार्यानेच अफगाणिस्तानने प्रगती केली असून अफगाणिस्तानमध्ये लोकशाही रुजवण्यामध्ये, शिक्षण पोहोचवण्यामध्ये भारताचा मोठा वाटा आहे. सध्या या दोन्ही देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत असून त्यासाठीही भारत आणि अफगाणिस्तान एकमेकाला सहकार्य करतील अशी आशा आहे,’ असे वक्तव्य अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी रविवारी केले.
सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आशिया आणि आफ्रिकेतील देशांबरोबर भारतीय भागीदारी-नवा आकृतिबंध’ या विषयावरील परिषदेमध्ये करझाई बोलत होते. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे, सिम्बॉयोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते सिम्बॉयोसिस सोसायटीचे उपाध्यक्ष ए. व्ही. संगमनेरकर आदी उपस्थित होते.
या वेळी करझाई म्हणाले, ‘‘अशांतता आणि अनेक स्थित्यंतरांना तोंड दिलेल्या अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीमध्ये भारताचा मोठा वाटा आहे. २० लाख डॉलरची मदत भारताने केलीच पण त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये आरोग्य केंद्र उभारणे, सिंचनाची व्यवस्था, संसदेची उभारणी यामध्ये भारताचे खूप सहकार्य मिळाले. अफगाणिस्तानमध्ये शिक्षण व्यवस्था उभी करण्याचे मोठे श्रेय भारताला द्यावे लागेल. अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याबरोबरच अफगाणिस्तानमध्ये शाळा, महाविद्यालये उभी करण्यामध्ये भारताने सहकार्य केले आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही शासन प्रणाली रुजवण्यामध्ये लोकशाहीची मोठी परंपरा असलेल्या भारतासारख्या देशाबरोबरच्या अनेक वर्षांच्या मैत्रीचा खूप उपयोग झाला. या मैत्रीमध्ये भारताला अफगाणिस्तानकडून काय मिळणार? तर अफगाणिस्तान हा आशियातील मध्यवर्ती देश आहे. अनेक देशांच्या सीमा अफगाणिस्तानशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आशियातील इतर देशांशी संबंध राखण्यासाठी अफगाणिस्तानची मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक संसाधने, खनिजे मोठय़ा प्रमाणावर आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये विकसनशील असणाऱ्या भारताला अफगाणिस्तानच्या मैत्रीचा नक्कीच लाभ होऊ शकतो.’’
प्यार किया तो डरना क्या…
सिम्बॉयोसिसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर.. ’ या गाण्यावरून भारताच्या आणि अफगाणिस्तानच्या प्रेमाचीही चर्चा होत असल्याची कोटी निवेदिकेने केली आणि त्याला ‘प्यार किया तो डरना क्या..’ असे चपखल उत्तर देऊन करझाई यांनी उपस्थितांची दाद मिळवली. करझाई यांनी सिम्बॉयोसिसमधील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. त्यांच्या मोकळेपणाने विद्यार्थी आणि उपस्थित भारावून गेले होते.
अफगाणिस्तानची प्रगती भारताच्या सहकार्यामुळे – हमीद करझाई
सध्या या दोन्ही देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत असून त्यासाठीही भारत आणि अफगाणिस्तान एकमेकाला सहकार्य करतील अशी आशा आहे,’ असे वक्तव्य अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी रविवारी केले.
First published on: 16-12-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamid karzai india afghanistan symbiosis