लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल आणि समतल विलगकांना (ग्रेडसेप्रेटर) पादचारी उन्नत मार्गाचा (फूट ओव्हर ब्रीज) अडथळा ठरणार असल्याने पादचारी उन्नत मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठीच २०१४ मध्ये पादचारी मार्ग उभारण्यात आला होता. मात्र आता त्याचा अडथळा ठरत असल्याचा साक्षात्कार महापालिकेला झाला आहे. त्यामुळे पादचारी मार्ग उभारण्यासाठी केलेला खर्च वाया जाणार असून महापालिकेच्या दोन विभागातील समन्वयाचा अभावही अधोरेखित झाला आहे.
नगर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. मेट्रो मार्गिकेची कामे आणि बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले असून, त्याअंतर्गत उड्डाणपूल आणि समतल विलगकांची उभारणी करण्याचे नियोजित आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसांत अंतिम करण्यात येणार आहे. मात्र, उड्डाणपूल आणि समतल विलगकांच्या नियोजनात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला विश्रांतवाडी चौकातील पादचारी उन्नत मार्ग अडथळा ठरत असल्यामुळे तो पाडण्याचा विचार सुरू झाला आहे.
आणखी वाचा-‘आरटीओ’ला दणका! लायसन्स, आरसीला विलंब झाल्यास आता अधिकाऱ्यांना दंडआणखी वाचा-
प्रस्तावित उड्डाणपूल आणि समतल विलगकांमुळे वाहतूक कोंडी ८० टक्क्यांनी कमी होईल, असा दावा महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाकडून करण्यात आला आहे. विश्रांतवाडी चौक हा वर्दळीचा चौक आहे. आळंदी, पुणे विमानतळ, धानोरी येथील रस्ते या चौकात एकत्र येतात. त्यामुळे या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने पादचाऱ्यांसाठीही रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत होते. त्यामुळे २०१४ मध्ये ६ कोटी ३८ लाख रुपये खर्च करून पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी पादचारी उन्नत पूल उभारण्यात आला. मात्र, नव्या वाहतूक आराखड्यात कोट्यवधी रुपयांचा पादचारी पूल अडथळा ठरत असल्याची उपरती महापालिकेला झाली आहे. हा पूल पाडण्याचे नियोजित असल्याने पादचाऱ्यांनाही गैरसोयीला जावे लागण्याबरोबरच महापालिकेची दूरदृष्टीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विश्रांतवाडी चौकातील पादचारी उन्नत पुलाची रचना त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आली होती. विश्रांतवाडी आणि परिसरातील वाहनांची संख्या आणि लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. चौक ओलांडण्यासाठी केवळ पादचारी पूल हा व्यवहार्य पर्याय ठरत नाही. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. त्याचा अपेक्षित वापरही होत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालबाह्य सुविधांऐवजी नव्या सुविधा द्याव्या लागणार आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
आणखी वाचा-गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज; विसर्जन घाटांवर विविध सुविधा
नगर रस्त्यावरील विश्रांतवाडी चौक प्रमुख आहे. उड्डाणपूल आणि समतल विलगक, भुयारी मार्गांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या सुविधा उभारण्यासाठी पादचारी पूल काढावा लागण्याची शक्यता आहे. विश्रांतवाडी चौकातून लोहगावकडे जाणारा उड्डाणपूल इंग्रजी वाय या आकाराचा असून त्यासाठी हा पूल अडथळा ठरत आहे. -अजय वायसे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महापालिका