हातकागद म्हणजे पिशव्या, ग्रिटिंग्ज किंवा फार तर चित्र काढण्यासाठी वापरायची गोष्ट.. ही ओळख बदलली असून आता त्याला नवे ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. हा बदल घडवून आणण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे, कारण या शहरात असलेली वैशिष्टय़पूर्ण ‘हातकागद संस्था’! या ठिकाणी हातकागदापासून फुलदाणी, पर्स, लॅम्प शेड, टोपली, थ्रीडी चित्र बनवले जात आहेत, विशेष म्हणजे त्याला मोठी मागणी असून, हातकागदाचा ‘भाव’ ही वाढला आहे.
पुण्यात हातकागद निर्मितीची संस्था असल्याने या कागदाचे शहराशी नाते आहे. या कागदाचा वापर पूर्वी केवळ लिहिणे आणि चित्र काढणे यापुरताच मर्यादित होता. पण अलीकडच्या काळात कलाकारांनी कल्पकतेने त्याला ‘ग्लॅमर’ मिळवून दिले आहे. त्याची अनेक उदाहरणे आहेत. वाळू आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली सुंदर फुलदाणी, कागदाचेच विविध आकार वापरून केलेली अधिक उठावरदार थ्रीडी चित्र, विविध आकार आणि डिझाइन्स असलेल्या आकर्षक कागदाच्या पर्सेस अशा सर्वच वस्तू आता लक्ष वेधून घेत आहेत. निरनिराळ्या आकारांमधल्या टोपल्या, वारली पेंटिंग सारख्या चित्रांनी सजलेली लॅम्प शेड हे कागदापासून तयार केलेले नवीन प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. हातकागद संस्थेत ‘पेपरटेल्स’ या ब्रॅण्डअंतर्गत त्यात अडीचशेहून अधिक प्रकार, अनेक रंग व डिझाइन्स आली आहेत. त्यामध्ये सुद्धा मार्बल, बाटिक, सिल्क, लिड, वारली, बटर, मेटॅलिक, लेदर या व इतर अनेक प्रकारांचा सामावेश होतो. संस्थेत हातकागदाच्या वस्तूंचे कलादालनही थाटले आहे, अशी माहिती हातकागद संस्थेतील कलाकार प्रज्ञा काळे यांनी दिली.
कलाकारांचीही या कागदाला पसंती मिळत आहे. ‘‘जलरंग चित्रकलेसाठी चित्रकार याच कागदाला पसंती देतो, कारण यावर रंग छान बसतो. त्यातील रफ, मॅट व कॅन्सन या प्रकारांना आम्ही विद्यार्थीसुद्धा प्राधान्य देतो,’’ असे भारती कला महाविद्यालयातील ‘फाइन आर्ट’ चा विद्यार्थी शिवराज वायचळ याने सांगितले.
हातकागद कसा तयार होतो?
हातकागद पातळ सुती कापड आणि कागद यांच्या मिश्रणातून तयार होतो. वाया गेलेला कागद आणि कापड यांचा लगदा करून त्यात गरजेनुसार रंग मिसळला जातो. हा लगदा जाळीवर पसरून त्यातील पाणी काढून टाकले जाते व त्याचा कागद तयार केला जातो. हा कागद एक किंवा अधिक दिवस उन्हामध्ये वाळवला जातो. कागद स्मूथ हवा असेल तर त्याला इस्त्री केली जाते. तसेच बाटिक किंवा मार्बल प्रकारासाठी पाण्यात तैलरंग टाकून त्यामध्ये कागद बुडवला जातो. यातून नक्षीदार कागद तयार होतो. कागदाच्या प्रकारानुसार प्रक्रिया थोडीफार बदलते.
हातकागदाला परदेशातही मागणी
सर्वात जाड ५४० जीएसएमचा ‘एलिफंट’ किंवा ‘जंबो’ कागदाला परदेशातही मागणी आहे. परदेशी नागरिक आधी मागणी करून हा कागद मोठय़ा प्रमाणात घेऊन जातात. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व कला महाविद्यालये, पुण्यातील स्टेशनरीची मोठी दुकाने, पुणे आणि मुंबईतील सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांनाही हातकागद संस्था कागद पुरवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा