दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. हा आनंद लुटताना ‘लाखो तारे आसमान पर एक मगर ढुंढे ना मिला, देख के दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला’ या गीताप्रमाणे समाजातील अनेक घटकांना सामोरे जावे लागते. हे ध्यानात घेऊन अशा वंचितांना, उपेक्षितांनाही दिवाळीचा आनंद लाभावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक संस्था आणि मंडळांनी अनेक सामाजिक उपक्रम करत वंचितांनाही दिवाळीचा आनंद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळी कुटुंबाबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर साजरी करताना समाजातील जे घटक दिवाळीपासून दूर राहतात त्यांनाही दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी पुण्यातील विविध संस्था, संघटना आणि मंडळांनी गेल्या तीन आठवडय़ात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने शहरातील संस्था आणि मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये यंदा लक्षणीय वाढ झाल्याचे दिसले. वसुबारस सणापासून सुरू झालेले हे कार्यक्रम तीन आठवडे सुरू होते.

सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिकांच्या घरी दीपोत्सव, अपंग सैनिकांबरोबर दिवाळी, अनाथ मुलांच्या वसतिगृहात दिवाळी, देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी भाऊबीज, विविध सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव, जे किल्ले फारसे प्रसिद्ध नाहीत अशा अपरिचित किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे चौकांमध्ये सादरीकरण, किल्ले स्पर्धा, पुणे जिल्ह्य़ातील मुळशी, वेल्हे या तालुक्यांमधील आदिवासी, कातकरी पाडय़ांवर जाऊन उपयुक्त वस्तूंचे तसेच फराळ, आकाशकंदील वगैरेंचे वाटप असे अनेकविध कार्यक्रम मंडळांनी आयोजित केले होते. मोठय़ा आकाराचे किल्ले तयार करून त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रमही यंदा अनेक मंडळांनी केला. विधायक, निनाद, सैनिक मित्र परिवार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, काळभैरवनाथ तरुण मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वीर शिवराय मंडळ या आणि अशा अनेक मंडळांनी तसेच संस्थांनी दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.

आदिवासी पाडय़ांवर आकाशकंदील, फराळाचे पदार्थ यासह विविध वस्तू वितरित करून दिवाळी साजरी केली. त्या बरोबरच पाडय़ांवर प्रत्येक घरात स्वच्छतेचे साहित्य वितरित करून स्वच्छतेचा संदेश दिला, तसेच शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल यासाठी जनजागृती केली.

-उदय जोशी, अध्यक्ष, निनाद संस्था

नको असलेल्या बाळांसाठी, मुलांसाठी काम करणाऱ्या श्रीवत्स संस्थेत जाऊन आम्ही तेथील मुलांबरोबर दिवाळी साजरी करतो. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मंडळांची आणि दात्यांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. आपुलकीची ही दिवाळी सर्वाना मोठा आनंद देते.

-पराग ठाकूर, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy diwali due to social activities
Show comments