दत्ता जाधव
पुणे : इंधन दरवाढीमुळे हवाई मार्गाने होणारी आंब्याची निर्यात अडचणीत आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत निर्यातीचा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. स्थानिक पातळीवर नैसर्गिक आपत्तींचाही हापूस उत्पादनाला फटका बसत आहे. त्यामुळे यंदा आंबा निर्यातीत पन्नास टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात आंब्याला दोनतीन टप्प्यात मोहोर आला आहे. पहिल्या टप्प्यातील आंब्यांचे थंडी, धुके आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास सुरुवात होईल. सध्या निर्यात सुरू झाली असली तरी गती आलेली नाही. एप्रिलच्या अखेरीपासून निर्यातीला गती येईल. स्थानिक बाजारात डझनाला ८००-१००० रुपये दर मिळत असल्यामुळे आणि आंब्याची आवक कमी असल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचा अद्याप निर्यातीवर भर नाही. बाजारात आंब्याची आवक वाढली, की निर्यातीला गती येईल.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कोकण विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूसच्या अमेरिका वारीवर अनेक मर्यादा असतात. देशातून हापूससह विविध प्रकारच्या सुमारे ५० हजार टन आंब्यांची निर्यात होते. त्यात केसर सर्वाधिक ५० टक्के, कोकणचा हापूस फक्त दहा-अकरा टक्के असतो. कोकणातून दरवर्षी सरासरी ७-८ हजार टन हापूस निर्यात होतो. त्यापैकी अमेरिकाला जाणारा हापूस फक्त १००० ते १२०० टनांच्या आसपास असतो. इतर युरोपीयन देश, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांनाही हवाई मार्गानेच निर्यात होते.
नैसर्गिक आपत्तींचा विपरीत परिणाम हापूस उत्पादनावर होत आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पणन मंडळाकडून शेतकऱ्यांना निर्यातीबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा. मुंबईत वाशी मार्केटमध्ये अद्ययावत निर्यातीसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांची निर्मिती केली आहे, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
– डॉ. भास्कर पाटील, कोकण विभागाचे उप सरव्यवस्थापक, पणन महामंडळ
नैसर्गिक आपत्तींचा परिणाम म्हणून यंदा हापूस उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोहोर आलेला हापूस आता संपला आहे. दुसऱ्या टप्प्यातील हापूस एप्रिलअखेर बाजारात येईल. यंदा निर्यातही पन्नास टक्क्यांपर्यंत घटणार आहे. पाडव्याला मुंबईतील वाशी मार्केटमध्ये सुमारे सव्वालाख पेटी आंबा विक्रीसाठी जातो. यंदा फक्त २० हजार पेटीच आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. आंबा उत्पादनात आलेल्या मोठय़ा घटीमुळे उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
– विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेता संघ