पुणे : अक्षय्य तृतीयेसाठी कोकणातून पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांत हापूसची मोठी आवक सुरू झाली आहे. आवक वाढल्याने दरांत घट झाली असून, तयार हापूस बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. प्रतवारीनुसार हापूसचा दर ५०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे.अक्षय्य तृतीया येत्या बुधवारी (३० एप्रिल) आहे. यंदा पाऊस लांबला, अपेक्षित थंडी पडली नाही, तसेच उष्मा वाढल्याने हंगामातील पहिल्या बहरातील मोहोर गळून पडला. हवामान बदलाचा फटका आंबा लागवडीवर झाला. त्यामुळे यंदा कोकणात आंब्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. नेहमीच्या तुलनेत आंब्याची लागवड ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली. अपेक्षित उत्पादन न झाल्याने हंगामाच्या सुरुवातीला आंब्याचे दर तेजीत होते.

हंगामातील दुसऱ्या टप्यात आंब्याची आवक वाढली आहे.‘आंब्याची आवक वाढली आहे. बाजारात तयार आणि कच्चा आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत आंब्याचे दर आवाक्यात आले आहेत. यंदा फळधारणा कमी झाल्याने आंब्याचा हंगाम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. दर वर्षी आंब्याचा हंगाम जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू असतो,’ असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

‘बाजारात सध्या चांगल्या प्रतीचा आंबा उपलब्ध आहे. बाजारात कोकणातून दररोज तीन ते साडेतीन हजार पेट्या आंब्याची आवक होत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दररोज सात ते साडेसात हजार पेट्यांची आवक होत होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे दर जास्त आहेत. उन्हाळ्यामुळे आंबा पक्व होण्याचे प्रमाण जास्त आहे. आंब्याची प्रतवारी चांगली आहे,’ असे आंबा व्यापारी करण जाधव आणि नितीन कुंजीर यांनी सांगितले.

हापूसचा दर

तयार हापूस (पाच ते नऊ डझन पेटी) – २५०० ते ४५०० रुपये

कच्चा हापूस (पाच ते नऊ डझन पेटी) – १५०० ते ३५०० रुपये

एक डझन हापूस (तयार) – ५०० ते ८०० रुपये

हंगाम लवकर संपणार

यंदा कोकणात आंब्याची लागवड कमी झाली आहे. हंगाम नेहमीच्या तुलनेत लवकर संपणार आहे. १५ मेपर्यंत आंब्याची आवक सुरू राहणार आहे. दर वर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आंब्याचा हंगाम सुरू असतो, अशी माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.