राहुल खळदकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असून, प्रतवारीनुसार बाजारात एक डझन आंब्यांचा दर ४०० ते ८०० रुपयांदरम्यान आहे. गेल्या आठवडय़ात एक डझन आंब्याचे दर ९०० ते १२०० रुपये होते. अक्षय तृतीयेनंतर आंब्यांची आवक वाढली असून, दरात घसरण नोंदविण्यात आली़

यंदा हवामान बदलाचा कोकणातील हापूस आंब्यांवर मोठा परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात बाजारात हापूसची आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात ती नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी होत नव्हती. त्यामुळे आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात नव्हते, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

अक्षय तृतीयेदरम्यान आंब्याची आवक वाढली. गेल्या आठवडय़ात १ ते ३ मेदरम्यान मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून एकूण मिळून २५ ते ३० हजार पेटय़ा हापूसची आवक झाली. अक्षय तृतीयेला आंब्यांची आवक वाढली होती. मात्र, मागणी जास्त असल्याने आंब्यांचे दर चढे होते. त्यानंतर रविवारी (८ मे) मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून हापूसच्या दहा ते पंधरा हजार पेटय़ांची आवक झाली. आंब्यांची आवक वाढल्याने दरात घट झाली. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याचे दर प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दरम्यान आहेत. हापूसच्या पेटीमागे एक हजार ते १२०० रुपयांनी घट झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

आंब्यांचे दर

कच्चा हापूस (चार ते सहा डझन पेटी) : ८०० ते १२०० रुपये

तयार हापूस (चार ते सहा डझन पेटी) : १८०० ते २००० रुपये

कच्चा हापूस (पाच ते दहा डझन पेटी) : १८०० ते २२०० रुपये

तयार हापूस (पाच ते दहा डझन पेटी) : २२०० ते ३००० रुपये

बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. दरात घट झाल्याने आता सामान्यांना हापूसची चव चाखता येणार आहे. हंगाम संपण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत आंब्यांचे दर आवाक्यातच राहतील. – अनिरुद्ध भोसले,  आंबा व्यापारी, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटना