पुणे : फळांचा राजा अशी ओळख असलेल्या कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास उशीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या लागवडीत १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी हंगामपूर्व हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. सव्वापाच डझनाच्या पेटीला ३१ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. हापूसचे आगमन बाजारात कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना असते. मार्केट यार्डातील फळबाजारात देवगडमधून रविवारी हापूसची पहिली पेटी विक्रीस पाठविण्यात आली. देवगडमधील शेतकरी साद मुल्ला यांच्या बागेतून आंब्याची पेटी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अनिरुद्ध तथा बापू भोसले यांच्या गाळ्यावर विक्रीस पाठविण्यात आली. सव्वापाच डझनाची पेटी व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी ३१ हजार रुपयांना खरेदी केली. कोकणातील साई आंबा सर्व्हिसेसचे प्रणीत मांजरेकर यांनी ही पेटी पुण्यात आणली होती. आंब्याच्या पेटीचे पूजन यावेळी करण्यात आले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळे आणि भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक दीपक तथा बाबा मिसाळ, अनिरुद्ध भोसले, गौरव घुले, अंकुश वाडकर, युवराज काची, राजू पतंगे, राजू भोले, अरुण वीर, रोहन जाधव, किशोर लडकर, शरद कुंजीर, प्रकाश पंजाबी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

हेही वाचा – राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा

यंदा कोकणात पाऊस जास्त झाल्याने आंब्याची हंगाम नियमित सुरू होण्यास काहीसा उशीर लागणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हापूसची तुरळक आवक होईल. १५ मार्चनंतर हापूसचा हंगाम नियमित सुरू होईल, अशी शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंब्यांची प्रतवारी चांगली राहिली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंबा लागवडीत १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे, असे आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध भोसले यांनी सांगितले.

Story img Loader