पिंपरी : विनापरवाना आंदोलन करून विशाल टॉकीज येथे सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याने संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी शहराध्यक्ष सतीश काळेंसह कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
छत्रपती संभाजी राजेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हर हर महादेव या मराठी चित्रपटा विषयी नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप त्यांनी केला होता. अशा प्रकारची इतिहासाची मोडतोड खपवून घेतली जाणार नसल्याचे संभाजी राजेंनी म्हटले होते त्याचे पडसाद सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात उमटले.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील विशाल टॉकीजमध्ये शिरून प्रेक्षकांना बाहेर काढले. चित्रपटाचा शो बंद पाडत घोषणाबाजी केली होती. या आंदोलनाची पुसटशीही कल्पना पिंपरी पोलिसांना नव्हती. अखेर, या प्रकरणी शहराध्यक्ष सतीश काळे यांच्यासह एकूण १३ कार्यकर्त्यांवर पिंपरी पोलिसांनी विनापरवाना आंदोलन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.