पुणे : आखाती देशात नोकरीच्या आमिषाने नेलेल्या पुण्यातील तीन महिलांचा छळ करण्यात आला. वेळेवर जेवण न देणे, मारहाण अशा प्रकारांना सामोरे जाणाऱ्या त्या महिलांनी अखेर राज्य महिला आयोगाशी संपर्क साधला. आयोगाने केलेल्या प्रयत्नांमुळे पुण्यातील तीन महिलांसह चेन्नईतील महिलेला पुन्हा मायदेशी आणण्यात यश आले आहे.
मुंबईतील एका दलालामार्फत पुण्यातील मार्केट यार्ड भागात राहणाऱ्या तीन महिला सौदी अरेबियात कामाला गेल्या होत्या. महिलांना चांगले वेतन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. सौदी अरेबियात तीन महिला घरकाम करत होत्या. त्यांचे मालक त्यांना वेळेवर जेवण देत नव्हते. कामाची वेळ संपल्यानंतर त्यांना कामास जुंपले जायचे. विरोध केल्यानंतर महिलांना मारहाण करण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे महिला नैराश्याच्या गर्तेत सापडल्या होत्या. त्यांनी समाजमाध्यमातून राज्य महिला आयोगाचा मोबाइल क्रमांक मिळवला.
हेही वाचा >>> हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून
त्यानंतर पुण्यातील तीन महिलांसह आणि चेन्नईतील एका महिलेला मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला होता. भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियातील दूतावासाशी चर्चा केली. त्यानंतर महिलांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, तसेच मायदेशी परतलेल्या पुण्यातील तीन महिला उपस्थित होत्या.
घरकामाच्या नावाखाली छळ
आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यात तुटपुंज्या पगारावर काम करत असणाऱ्या महिला चंदननगर भागातील एका महिलेच्या संपर्कात आल्या. चंदननगरमधील महिलेने त्यांना आखाती देशात चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे आमिष दाखविले होते. या महिलेच्या मध्यस्थीने त्यांनी मुंबईतील दलाल हमीद शेख आणि अली भाई यांच्याशी संपर्क साधला. सौदी अरेबियात घरकाम करणाऱ्या महिलांना चांगला पगार देण्यात येतो. दरमहा ३५ हजार वेतन मिळेल, असे दलालांनी आम्हाला सांगितले होते. २०२२ मध्ये महिलांना रियाध आणि हफर अली बातीन शहरात नोकरी मिळाली. तेथे काम करण्यास सुरुवात केली. घरकामाच्या नावाखाली आमचा छळ सुरू करण्यात आला. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीही काम करुन घेतले जात होते. कामाची वेळ संपली असे सांगितल्यानंतर मारहाण करण्याचे प्रकार सुरू झाले. विरोध केल्याने जेवण दिले जात नव्हते. अखेर समाजमाध्यमातून राज्य महिला आयाेगाचा क्रमांक मिळविला. या क्रमांकावर संपर्क साधण्यात आल्यानंतर आम्हाला मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांमुळे आम्ही मायदेश परत येऊ शकलो, असे महिलांनी सांगितले.
मस्कतमधून एका महिलेची सुटका
जुलै महिन्यात पुणे पोलिसांनी मस्कतमधून एका महिलेला मायदेशी परतण्यासाठी मदत केली. पुण्यातील घोरपडे पेठेत राहणाऱ्या महिलेला नोकरीचे आमिष दाखविले होते. तिचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. याप्रकरणी पोलिसांनी एका दलालाविरुद्ध गु्न्हा दाखल केला होता, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांनी सांगितले.
पुण्यातून २८५ मुली बेपत्ता
विवाहाचे आमिष तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यातील २८५ मुलींना फूस लावून पळवून नेले होते. ऑगस्ट अखेरपर्यंत पुण्यातून २८५ मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे होत्या. त्यापैकी २२२ मुलींचा शोध पुणे पोलिसांनी घेतला. ६३ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी ‘१०९१’ हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. मुलगी किंवा महिला बेपत्ता झाल्याची तक्रार हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.