पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे आणखी एक जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. १७ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस झाला. यावेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र महाराष्ट्राचा मावळा आणि गुजरातची कन्या यांनी एका अनोख्या पद्धतीनं मोदींना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. अनिल वाघ आणि हिना पटेल या दोन गिर्यारोहकांनी हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरुन रॅपलिंग करत मोदींना शुभेच्छा दिल्या. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट आहे.

याआधी कोणीही अस रॅपलिंग याठिकाणी केलेले नाही. मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी हे अंतर पार केलं. १७ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता अनिल आणि हिना पटेल यांनी कोकणकड्यावरुन कमांडो रॅपलिंग म्हणजेच दोरला उलटे लटकून उतरण्याला सुरुवात केली. साधारणत: ५० फुटाचं अंतर खाली गेल्यानंतर तिरंगा ध्वज तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभेच्छा बॅनर दाखवत त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. कोकणकड्यावर अवघ्या २५ मिनिटांत कमांडो रॅपलिंग करणारा अनिल वाघ हा महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती ठरला. गुजरातची हिना पटेलने त्याला उत्तम साथ देत महिलांमधील ताकद दाखवून दिली.

यशस्वीरित्या रॅपलिंग झाल्यानंतर दोरच्या साह्याने पुन्हा येणे तेवढंच कठीण असतं. दोघांनी ते आरामात केलं. कोकणकड्यावर आत्तापर्यंत कोणत्याही कमांडोने रॅपलिंग केलेले नाही. यापूर्वी अनिल वाघ या गिर्यारोहकाने २२ मिनिटांत लिंगाणा सर केलेला आहे. अनिल वाघ गेल्या ८ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये अग्निशमन दलाच्या सेवेत फायरमॅन या पदावर कार्यरत आहेत. २०१२ पासून अनिल हे ट्रेकिंग करतात. त्यांनी सुरुवातीला हरिशचंद्र गड यशस्वीपणे सर केला होता. आत्तापर्यंत १८० च्या वर गड किल्ले चढाई केले आहे. तसेच सह्याद्रीतील अनेक घाटवाटा सर केल्या आहेत. गंगोत्री तीन, भागीरथी दोन, देवतीब्बा, स्टोक घोलप, स्टोक कांगरी, हनुमान तिब्बा, फ्रेंड्स पीक, आयलंड पीक, रोहतांग पास या हिमालयातील ११ शिखरांवर ही त्यांनी यशस्वीपणे चढाई केली आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे देखील अनिल वाघ यांनी सर केले आहे.

या मोहिमेसाठी अनिल वाघ यांनी खूप मेहनत घेतली. जवळपास २ महिन्यांपासून या मोहिमेची तयारी सुरु होती. गुजरातमधील अहमदाबाद येथील हिना पटेल या साहसी तरुणीने दहा दिवस पुणे येथे विशेष प्रशिक्षण घेतले होते.

Story img Loader