पुणे : सध्या आंबाचा हंगाम सुरू असून, ते मोठ्या प्रमाणात कृत्रिमरीत्या पिकविले जातात. यासाठी काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईड आणि एसिटीलीन गॅस या बंदी असलेल्या घटकांचा वापर केला जातो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
प्रशासनाकडून फळ व्यापारी आणि विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू आहे. आंब्यासह इतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. आंबा पिकविण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर करण्यास परवानगी आहे. असे असले तरी त्यासाठी विशिष्ट नियम आखून देण्यात आले आहे. त्याचे पालन फळ व्यापारी आणि विक्रेत्यांनी करावयाचे आहे. फळांवर थेट इथिलीनची फवारणी करण्यास मनाई आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास त्या फळांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. याचबरोबर नियमांचा भंग करणाऱ्या विक्रेत्यांवर खटले दाखल केले जाणार आहेत. आंब्यावर थेट इथिलीनची फवारणी करून ती पिकविण्यात येत असल्याचे आढळल्यास तो संपूर्ण साठा नष्ट केला जाईल. फळांची हाताळणी, साठवून आणि विक्री करताना कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत फळ विक्रेत्यांच्या कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
शीतपेय विक्रेत्यांची तपासणी
उन्हाळ्यामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी शीतपेय विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. या विक्रेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या बर्फाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासनाकडून शीतपेय, उसाचा रस आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडील बर्फाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. अनेक विक्रेत्यांकडून औद्योगिक बर्फाचा वापर केला जातो. तो आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ही कारवाईची मोहीत हाती घेतली आहे, असे प्रशासनाने नमूद केले आहे.
आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यास मनाई आहे. इथिलीन गॅसचा वापर आंबा पिकविण्यासाठी करता येतो. मात्र, थेट इथिलीनच्या द्रवाची फवारणी फळांवर करण्यास परवानगी नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. -सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग