पुणे विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षक आता आयआयटीच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकणार आहेत. आयआयटी दिल्ली आणि पुणे विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन्ही संस्थांदरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम होतील. तसेच उन्हाळी सुट्टय़ांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधीही पुरविल्या जातील.
या कराराचा प्रस्ताव मांडला गेल्याची माहिती आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांनी दिली आहे. ‘केजे’ज एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट’तर्फे (केजेइआय) आयोजित करण्यात आलेल्या ‘वायरलेस ब्रॉडबँड सेवा’विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेवगांवकर बोलत होते.
ही परिषद तीन दिवस चालणार असून यात सामाजिक सुधारणांसाठी माहिती संज्ञापन तंत्रज्ञानाचा कसा वापर करून घेता येईल, या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी स्टँडर्डायझेशन फोरम ऑफ इंडिया’ चे (जीआयएसएफआय) अध्यक्ष रामजी प्रसाद, केजेइआयचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, संस्थेच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव वाघ या वेळी उपस्थित होते.
शेवगांवकर म्हणाले, ‘‘पुणे विद्यापीठात तंत्रज्ञानातील एम. टेक.- पीएच. डी. अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आयआयटी दिल्ली हे मार्गदर्शन पुरविण्यास तयार आहे. केवळ पुणे विद्यापीठच नव्हे तर तंत्रज्ञानविषयक शिक्षण देणाऱ्या इतर संस्थांनाही आयआयटी मार्गदर्शन करू शकेल. सरकारी अनुदान प्राप्त असणाऱ्या शिक्षण संस्थांसाठीच्या ‘गुणवत्ता सुधार कार्यक्रमा’अंतर्गत शिक्षक आयआयटीत येऊन प्रशिक्षण घेतात. हा उपक्रमही तसाच सुरू राहणार आहे. कोणतेही संशोधन बहुतांश वेळा त्याचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांवर अवलंबून असते. त्यांना आपल्या क्षेत्रातील इतर संशोधकांशी चर्चा करायला मिळेल अशी यंत्रणा निर्माण होणे आवश्यक आहे.’’
जीआयएसएफआय आणि डेन्मार्क येथील ‘आलबॉर्ग युनिव्हसिटी’ या संस्थांतर्फे केजेइआय महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे रामजी प्रसाद यांनी सांगितले. या कराराअंतर्गत अभियांत्रिकी व विज्ञान शाखांत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे आदानप्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
दिल्ली आयआयटी व पुणे विद्यापीठ यांच्यात होणार सामंजस्य करार
पुणे विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षक आता आयआयटीच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकणार आहेत. आयआयटी दिल्ली आणि पुणे विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन्ही संस्थांदरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम होतील. तसेच उन्हाळी सुट्टय़ांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधीही पुरविल्या जातील. या कराराचा प्रस्ताव मांडला गेल्याची माहिती आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांनी दिली आहे.
First published on: 12-03-2013 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harmony agreement between pune univ delhi iit