|| श्रीराम ओक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विशेष मुलं’ हे दोन शब्द त्या मुलांच्या पालकांसाठी जेवढे त्रासदायक असतात, त्यापेक्षा या शब्दांना सोबत घेऊन जगणे त्या मुलांसाठीदेखील तेवढेच अवघड असते. विशेष मुलांचे केवळ पालनपोषण करणेच नाही, तर त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या जबाबदारीबरोबरच सर्वात मोठी जबाबदारी असते ती या विशेष मुलांना समाजाने सामावून घ्यावे म्हणून. या धडपडीत दिलासा मिळतो, तो हर्षां मुळे यांच्यासारखी कार्यकर्ती आणि प्रशिक्षिका विशेष मुलांच्या पालकांना लाभते तेव्हा.

मुलांना संस्कारक्षम करण्यासाठी आणि त्यांचे जीवन घडावे, मार्गी लागावे, म्हणून प्रत्येक पालक कसोशीने प्रयत्न करीत असतात. पण पालकांची कसोटी लागते ती विशेष मुलांना वाढविताना. प्रीझम फाऊंडेशनसारख्या काही विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. या संस्थेमध्ये शिकविण्यासाठी आलेल्या हर्षां सुनील मुळे आज प्रीझमच्या संचालिका आहेत. आपल्या दैदीप्यमान कार्यपद्धती, मुलांबद्दलचा विशेष जिव्हाळा, प्रेम, कार्यकुशलता, कल्पकता अशा विविध गुणांमुळे आज त्या तेथे संचालिका म्हणून कार्यरत आहेत.

हर्षां यांनी इंदौर विश्वविद्यालयातून एम.एस्सी.केले. लग्नानंतर त्या पुण्यात आल्या. पुण्यात बी.एड. पूर्ण केल्यानंतर काही वेगळे काम करता येते का? याचा शोध घेत असताना त्यांची प्रीझमच्या अध्यक्षा पद्मजा गोडबोले यांच्याशी भेट झाली आणि त्यांना जे वेगळे कार्य करायचे होते ते करण्यास सुरुवात झाली. फिनिक्स शाळेतील दहावीच्या अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांना हर्षां यांनी शिकविण्यास सुरुवात केली. ही मुले दहावीच्या परीक्षेला बसली आणि त्या मुलांना मिळालेले यश पाहून हर्षां केवळ आनंदितच झाल्या नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वासही यातून वाढत गेला.

एका बाजूला विशेष मुलांना समाज सामावून घेत नाही, तर दुसऱ्या बाजूला त्यांना शिकविण्यासाठी इतर शिक्षकांपेक्षाही वेगळे प्रशिक्षण घेतलेले अशा प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते. या शिक्षकांकडे शिकविण्याच्या कौशल्याची गरज जशी लागते, तसेच संयमाबरोबरच भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याचे कसब असावे लागते. बोलण्यात ऋजुता, मार्दव या सगळय़ाबरोबरच इतर शिक्षकांपेक्षाही मुलांना समजावून देण्यासाठी अधिक परिश्रम तर घ्यावे लागतात. हे लक्षात घेत, शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या हर्षां यांनी आपल्या कार्यक्षेत्रात भरारी घेण्यास सुरुवात केली. विविध उपक्रम राबवित असतानाच स्वत: विविध प्रकारचे प्रशिक्षणही घेतले. त्यांच्या कार्यातील त्यांचे यश त्यांना वरच्या पदापर्यंत घेऊन गेले. त्या मुख्याध्यापिका झाल्या, त्याबरोबरच त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे कार्यदेखील सुरू केले आणि त्यांच्या या कार्याची झेप त्यांना संचालकपदापर्यंत घेऊन आली. अधिकाधिक पालकांचे आणि पर्यायाने त्यांच्या मुलांचे कल्याण व्हावे यासाठी हर्षां अहोरात्र झटत असतात.

संस्थेला आय.एस.ओ. प्रमाणित करण्यासाठी संस्थेत कार्यपद्धतीची कार्यप्रणाली राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आज प्रीझमला आयएसओने गौरविण्यात आले आहे. प्रीझम फाऊंडेशनची कार्य पद्धती समजून घ्यायची असेल, त्यांच्या मुलांसाठी काही कार्य करायचे असेल तर ८९७५४०८८४० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वेगळ्या वाटेवरचा आपला प्रवास अनुभवांबरोबरच सासू-सासरे, नवरा, मुलगी यांच्यामुळे जसा सुखकर होऊ शकला तसेच या प्रवासातील सर्व सहकारी, संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांमधील मुख्याध्यापिक, शिक्षिक या सर्वामुळेच संस्थात्मक कार्यात प्रगती झाल्याचे हर्षां आवर्जुन सांगतात. आत्तापर्यंत मिळालेल्या यशाचे सगळे श्रेय जसे या सर्वाना आहे, तसेच या मुलांच्या पालकांनाही द्यावे लागेल. या विशेष मुलांच्या पालकांशी सुसंवाद साधत, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच जाणीवजागृतीची गरजदेखील त्या बोलून दाखवतात. त्यामुळेच २८ वर्षांपासून विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या हर्षां मुळे या अध्ययन अक्षमता, संमिश्र अपंगत्व, मतिमंद अशा समस्या असणाऱ्या मुलांनी पुढे जावे यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत. समाजामध्ये या विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांसारखे जगता यावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच समाजामध्ये विशेष शिक्षणाविषयी जनजागृती करण्याचे कार्यदेखील त्या जोमाने करीत आहेत.

 

shriram.oak@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harsha mule
Show comments