इंदापूर : चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी भेट झाली.या भेटीप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात संवाद साधला. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूच्या सहकार मंत्र्यांबरोबर एक बैठक झाली
तामिळनाडू राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात राज्य सरकार हे केंद्रीय सहकारिता विभागाला पत्र लिहिणार आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून तामिळनाडू राज्याचा असलेला सरासरी साखर उतारा व देय एफआरपी या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करून मार्ग काढावा, अशी चर्चा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमध्ये झाली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारिता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) चे अतिरिक्त कार्यकारी संचालक पंकज कुमार बंसल यांचेकडील गिंडी, चेन्नई येथील आयोजित बैठकीत तामिळनाडू राज्याचे सहकार मंत्री के. आर. पेरियागरुप्पन हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूचे सहकार मंत्री के. आर. पेरियागरुप्पन यांचेसमवेत तेथील साखर उद्योगाचा विकास व अडीअडचणीसंदर्भात एक बैठक झाली. तामिळनाडूमध्ये सद्या १८ सहकारी साखर कारखाने आहेत. या बैठकीमध्ये तामिळनाडू राज्यातील साखर कारखानदारीचा विकास, इथेनॉल प्रकल्प उभारणी व त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) कडून कर्ज पुरवठा करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.