पिंपरी : ‘पक्षात गट-तट चालणार नाहीत. कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, रस्त्यावर उतरून संघर्ष करा, असा सल्ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आलेल्या सपकाळ यांनी शनिवारी काँग्रेस भवनात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची आढावा बैठक घेतली.

त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक बाबू नायर, उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, नरेंद्र बनसोडे, प्रवक्ते गौरव चौधरी, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, श्यामला सोनवणे या वेळी उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, ‘गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. संघटनात्मक ताकद वाढवावी. पक्षाचे संघटन बळकट करून बूथ कमिट्या सक्षम कराव्यात. सदस्यनोंदणी करावी. यापूर्वी प्रदेश नेत्यांचे शहराकडे दुर्लक्ष झाले असेल; परंतु यापुढे होणार नाही. मी स्वतः शहराकडे लक्ष देणार आहे.’

‘महापालिका निवडणूक कधी होईल हे माहीत नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. स्वबळावर की महाविकास आघाडीसोबत लढायचे, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावे. महापालिकेत काँग्रेसचा प्रतिनिधी असलाच पाहिजे. काही दिवसांत शहरात निरीक्षक पाठवले जातील. ते सर्वांच्या समस्या जाणून घेतील.’ असे सपकाळ म्हणाले.

पिंपरी- चिंचवड ही उद्योगनगरी आहे. उद्योजकांच्या समस्या, वाढती महागाई, महापालिकेतील भ्रष्टाचार, सहा वर्षांपासून सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा, शहरात होणारी वाहतूककोंडी या विविध प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे,’ अशी सूचना सपकाळ यांनी केली.

प्रदेशनेतृत्वाचे शहराकडे दुर्लक्ष पिंपरी-चिंचवड शहराकडे प्रदेशनेतृत्वाने लक्ष दिले नाही. प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर कोणत्याही मोठ्या नेत्याने शहरातील कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. केंद्रात, राज्यात सत्ता असताना शहराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्ष कमकुवत केला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा स्वजिल्हा असल्याने काँग्रेस नेते लक्ष घालत नसल्याची भावना काँग्रेस जनांमध्ये झाली आहे. मागीलवेळी महापालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकही मतदारसंघ काँग्रेस पक्षाला घेतला नाही. त्यामुळे शहरात पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचत नाही. पक्षात कमकुवत होत असतानाही गटबाजी कायम आहे. नेते आल्यानंतर पदाधिकारी एकत्र येतात. पण, नेते पुढे जाताच गटबाजी सुरू होते, अशा तक्रारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केल्या. शहरात पक्षाचा एक मेळावा घेण्याची मागणीही केली. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी की महाविकास आघाडीसोबत यावरून कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले. काहींनी स्वबळावर तर काही पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढविण्याची मागणी केली.

Story img Loader