लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील बीड, परभरणी, बुलढाणा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला असून, गृह विभागाकडून कुठलीच ठोस कार्यवाही केली जात नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पुण्यात केला. महाराष्ट्र सरकारचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीकास्त्र डागले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबासोबत केलेल्या तुलनेच्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट करत विधान मागे घेणार नसल्याचेही ठणकावून सांगितले.

महापुरुषांचा अपमान करा आणि पुरस्कार मिळवा, असा नवा पायंडा राज्य सरकारने पाडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोलापूरकरसारखी एक व्यक्ती अपशब्द बोलते आणि त्याला सरकार सुरक्षा पुरवते. गृहमंत्र्यांच्या नागपुरातील प्रशांत कोरटकरला सुरक्षा पुरवली जात असून, कोरटकर दोनदा पळून जातो, तरी गृह विभागाला कळत नाही. हे सर्व गृह मंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशक्य आहे. कारण, माजी मंत्र्याचा मुलगा देशाबाहेर जात असताना तातडीने समजते आणि सात तासांच्या आत त्याला माघारी आणले जाते, तर कोरटकर देशाबाहेर जाताना गृह विभागाला कसे समजले नाही, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांची औरंगजेबाच्या कारभारासोबत तुलना केली, तर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जातो. माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, चौकशी करून कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून सांगितले जाते. हे म्हणजे असंस्कृत आणि असभ्य शासन कारभार सुरू असल्याचे उदाहरण असल्याचे नमूद करत सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

Story img Loader