इंदापूर: पुणे जिल्ह्याचा पूर्व भागातील इंदापूर, दौंड, बारामती व सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील करमाळा ,माळशिरस तालुक्यात ज्वारी पिकाच्या काढणीला आता वेग आला आहे . उजनी धरणाच्या निर्मितीनंतर करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील मोठे क्षेत्र उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून ओलिताखाली आले. त्यामुळे शेतकरी केळी, ऊस, पेरू, डाळिंब आदी नगदी पिकाकडे वळाल्याने ज्वारीच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झाली असून पारंपारिक ज्वारी आता केवळ आठमाही व कोरडवाहू क्षेत्रातच घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग दौंड इंदापूर, बारामती सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग हा एकेकाळी ज्वारी पिकासाठी आगार मानला जात असे. निरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये ज्वारीच्या पिकाला एक अनन्यसाधारण महत्त्व होते.सिंचन व्यवस्था अपुरी असल्यामुळे थोडक्या पाण्यामध्ये येणाऱ्या व दररोजच्या आहारामध्ये सर्रास वापर होणाऱ्या ज्वारीची पिके मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जात होती. त्याचवेळी केवळ ज्वारी हे पीकच शेतकऱ्यांचे बाजारपेठेतील पत निर्माण करीत होते. शेतकरी ज्वारीची विक्री करून आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह व कडबा विक्रीतून आलेल्या पैशातून दैनंदिन गरजा भागवत असे .व घरी खाण्यासाठी ‘सालचंदी’व घरातील जनावरांसाठी चारा म्हणून कडब्याचा मोठा वापर होत असे. कडबा विक्रीसाठी मोठ्या गावामध्ये कडब्याचा मोठा बाजार भरत असे. सन १९७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये ज्वारी धान्याला जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्यावेळी भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात खुष्कीच्या मार्गाने शेतकरी, व्यापारी ज्वारी आणत असत. अशी आठवण जुन्या काळातील शेतकरी अजूनही सांगतात.

अलीकडच्या काळामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे ज्वारी सुद्धा महाग विकली जात असून कडब्याचे भावही गगनाला भिडले आहेत. ज्वारी काढण्यासाठी अत्यंत कष्ट करावे लागते. हाताला फोड येतात. त्यामुळे ज्वारी काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. पिकाची पक्ष्यांपासून राखण करणे हे कामही महिनाभर चालते. ज्वारी काढणे, पेंढ्या बांधणे, खुडणे ,मळणी करणे त्या तुलनेमध्ये पाठीमागील वीस वर्षांपूर्वी ज्वारीला नगण्य बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी परवडत नसल्याने कानाडोळा केला असल्याचे दिसून येते. आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच गावोगावी शेतकरी ज्वारीची पिके घेतात. आता ज्वारीच्या मळणीसाठी मळणी यंत्र मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे मळणी यंत्रावर ज्वारी केली जाते. परंतु एकेकाळी ज्वारी करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये, घराच्या आजूबाजूला जिथे चांगली जागा असेल त्या ठिकाणी ज्वारीची मळणी करण्यासाठी ‘खळी’ तयार करीत असत.

पंचवीस- तीस फूट गोल वर्तुळाकार जमीन खणून ,त्यावर पाणी टाकून बैलांच्या पायाने तुडवून खळी केली जात असत. त्यावर शेणाचे सारवण केल्यावर खळे तयार होते असत. याच खळ्यात ज्वारीची कणसं टाकून बैलाच्या साह्याने खळ्यामध्ये कणसांवर बैल गोल-गोल फिरवून ज्वारी बैलांच्या पायाने तुडवली जात असे. त्या कणसांतून ज्वारी मोकळी करून उफणली जात असे. या ज्वारीला मदन म्हणत असत हे मदन ओपन ने मोठे जिकिरीचे काम असे. ज्वारीची कुस अंगाला लागल्यास त्याची भयंकर ‘खाज’ सुटत असल्याने ज्वारी उफणण्याच्या कामाला तर घरातील सर्व मंडळी खळ्यामध्ये काम करत असत.अशा पद्धतीची पारंपारिक खळी गावच्या शिवारास सुगी सराईच्या दिवसात हमखास आढळून येत असत. मात्र शेती सुधारणाच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या मळणी यंत्र उपलब्ध झाली .शेतकरी आता मळणी यंत्राकडूनच ज्वारी करणे पसंत करत असल्याने अशा प्रकारची ‘खळी’ आता नामशेष झाली आहेत. अलीकडील वीसेक वर्षात तर परिसरामध्ये एकही खळे आढळून आले नाही.

शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खळ्याला एक विशेष महत्त्व होते. बाजारपेठेतून काही वस्तू शेतकऱ्याने उधार आणल्या तर त्याचे देणे, मी ज्वारीच्या खळ्यावर नक्की देईन. दुकानदारांना अशी खळ्याची हमी दिली जात होती. असे काही व्यवहार ज्वारीच्या खळ्यांशी गुंतले होते. मात्र आता ही ‘खळी’ गावच्या शिवारातून हद्दपार झाली आहेत.