घर बांधतानाच सहाव्या मजल्यावर हिरवाई फुलवायची ठरले होते. तसे नियोजन केले होते. पंधरा वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल रिचार्जिग हे शब्द आज इतके प्रचलित नव्हते, त्या वेळी आमच्या नवीन इमारतीच्या आराखडय़ात माझे यजमान, सुनील भिडे यांनी इमारतीच्या गच्चीवरील पाणी बोअरमध्ये सोडून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आराखडा तयार केला होता. इमारतीसाठी बोअरवेल केली. तेव्हा आसपास फार बोअरवेल्स नव्हत्या. पाणी लगेच लागले. इमारत झाल्यावर गच्चीवरील पाणी पीव्हीसी पाइपमधून जमिनीतील सिमेंटच्या पन्हाळीतून बोअरकडे नेले, त्या पाण्याच्या वाटेत एक खड्डा केला, ज्यामध्ये पाण्यातून झालेली माती व इतर काही कचरा साठून केवळ पाणीच बोअरकडे जाईल, अशी व्यवस्था केली. बोअरच्या भोवती १० फूट बाय ८ फूट बाय १५ फूट असा विटांचा खड्डा बांधून घेतला व त्यामध्ये तळापासून विटांचे तुकडे व खडी भरली. सिमेंटच्या पन्हाळीतून आलेले गच्चीवरचे पावसाचे पाणी या खडीतून फिल्टर होऊन बोअरमध्ये जाते. बोअरमध्ये माती जाऊ नये म्हणून त्याभोवती भोकं पाडलेला जीआयचा सुरक्षित पाइप (केसिंग पाइप) बसवला आहे. या व्यवस्थेमुळे गच्चीवर पडणारे पाणी बोअरमध्ये जाते व बोअरच्या पाण्याने गच्चीवरील झाडांची पाण्याची गरज भागते.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे हे पटले की त्याचा गैरवापर होत नाही. गेली नऊ-दहा वर्षे माझ्या स्वयंपाक घरातील सिंकमध्ये नळाच्या खाली छोटी बादली ठेवलेली असते. भांडी धुतलेले पाणी, कपबशा विसळलेले पाणी, भाज्या, तांदूळ, डाळी, पोहे धुतलेले पाणी, हात धुतलेले पाणी यात साठवून झाडांना घातले जाते. दिवसाकाठी सात लिटरच्या तीन बादल्या असतात. रोज एकवीस लिटर पाणी झाडांना द्यायला उपयोगी पडते. साबणाच्या बारचे पाणी वापरल्याने झाडांना त्रास होत नाही, असा आमचा अनुभव आहे. अन्न कणांचे पाणी झाडांना आवडते. तुम्ही पण भांडी विसवलेले, फरशी पुसलेले पाणी झाडांना घालून पाणी वाचवू शकता. आमच्या गच्चीवर झाडे खूप. त्यामुळे पाण्याची गरज जास्त अन् गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस आम्हाला धक्क बसला. बोअरवेल आटली, कोरडी पडली, सुकून गेली. पंधरा वर्षांत आजूबाजूला झालेल्या विविध बदलाचा थेट परिणाम जाणवला. आजूबाजूला अनेक बोअरवेल झाल्या. कोणीही पाण्याचा पुनर्भरणाची तसदी घेतलेली नाही. खड्डय़ाच्या आजूबाजूला कुठेही मातीचा तुकडा शिल्लक राहिलेला नाही. सगळीकडे डांबर, काँक्रिट, पेव्हिंग ब्लॉक्स, नाही तर स्वच्छ शहाबाद फरशा बसल्या आहेत. आभाळाचं दान जमिनीला न मुरता वाहून जात आहे.

Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
msrdc first step to get shaktipeeth project underway
‘शक्तिपीठ’ला पुन्हा बळ; राज्य सरकारचा हिरवा कंदिल

बोअरवेल आटल्यावर तोंडचे पाणी पळाले. एवढी झाडं जगवायची कशी? सुनीलच्या मनात बरेच दिवस ‘ग्रे वॉटर रिसायकलिंग’चा प्रयोग करण्याचे घोळत होते. त्यास संधी व चालना मिळाली. पाचव्या मजल्यावरील घरातल्या बाथरूममधील पाणी व खालच्या मजल्यावरील ऑफिसच्या बेसिनचे पाणी तळमजल्यावर एका टाकीत साठवून त्याचा वापर झाडासाठी करण्यासाठी त्यांनी एक आराखडा केला.

एका प्लास्टिक ड्रमला भोक पाडून त्यात खडी घालून पाइपमधून येणारं ‘ग्रे वॉटर’ त्यात सोडलं. ‘ग्रे वॉटर’ म्हणजे केवळ अंघोळीचे व बेसिनचे पाणी आहे. हे ‘ग्रे वॉटर’ खडीमध्ये फिल्टर होऊन दुसऱ्या ड्रममध्ये जाते, तेथे परत फिल्टर होऊन हजार लिटरच्या टाकीत साठेल, अशी व्यवस्था केली. पंपाने हे पाणी उचलून सहाव्या मजल्यावर ठिबक सिंचनाने झाडांना पाणी मिळते. रोज साठलेले पाणी रोज वापरता येईल अशी योजना आहे. या योजनेमुळे झाडे खूश झाली. आम्हाला नवीन प्रयोग यशस्वी झाला याचा आनंद झाला. पाण्याचे स्वयंपूर्णता गेली होती ती परत कमावली. या पाण्यास थोडा वास येतो. त्यासाठी आमचे निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ स्नेही हैदराबादचे डॉ. साईभास्कर रेड्डी यांचे विशेष प्रक्रियेने केलेला कोळसा ‘अ‍ॅन्टीवेटेड चारकोल’ पाठवला आहे. त्याचा उपयोग आता करू. मोठय़ा सोसायटय़ा, बंगले, फार्म हाउस यामध्ये बोअरवेल असली, तरी पाण्याच्या पुनर्वापराचा विचार होणे गरजेचे आहे. ते सहज शक्य आहे. नवीन सोसायटय़ांच्या सुशोभीकरणासाठी अफाट पैसे खर्च होतात. त्याच वेळी पाण्याच्या फेरवापरासाठी पैसे खर्च केले तर हिरवाईसाठी शाश्वत व्यवस्था होईल.

आजही बोअरवेल करणारे त्याच्या पुनर्भरणाची व्यवस्था करत नाहीत. जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागासुद्धा ठेवत नाहीत. आवार स्वच्छ ठेवण्यासाठी काँक्रिटीकरण करताना उतार देऊन पाणी खड्डय़ात मुरवणे गरजेचे आहे. नाही तर भूजल पातळी खाली जाणार. भूजल कमी होते आहे याची खंत कोणाला नाही. पाणी वाचवायची इच्छाशक्ती नाही. हे बदलू या. तहान लागल्यावर विहीर खणण्याऐवजी आपला हिरवा कोपरा, सोसायटी व बंगल्यातली हिरवाई जागवण्यासाठी पाण्याच्या पुनर्भरणाचे प्रयोग करू या. आज जागतिक जलदिनाच्या निमित्ताने हाच संकल्प करू!

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Story img Loader