पुणे शहराच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीवर शिवसेनेने टीका केली असून, सत्ताधाऱ्यांना विरोधी आमदार आणि गटनेत्यांचे वावडे आहे का, असा प्रश्न शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे.
पुण्याच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी मुंबईत घेतली. मात्र, या बैठकीत अन्य पक्षांच्या गटनेत्यांना तसेच विरोधी आमदारांना बोलावण्यात आले नव्हते. डॉ. गोऱ्हे यांनी मंगळवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन या बैठकीवर टीका केली. त्या म्हणाल्या की, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पवार यांनी मुंबईत बोलावली होती. पिंपरी-चिंचवडमधील निवडक आमदारांनाही बैठकीला बोलावण्यात आले होते. दोन्ही महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांना बोलावले जात असताना फक्त विरोधी पक्षाच्या आमदार व पदाधिकाऱ्यांना का डावलण्यात आले?
पुणे शहराच्या प्रश्नांबाबत राज्य शासन, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असून त्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आमदार, अधिकारी यांच्या बैठका होणे गरजेचे आहे. मात्र, अशा बैठकांबाबत राष्ट्रवादीला विरोधी पक्षांचे आमदार, गटनेते यांचे वावडे आहे का, असा प्रश्न डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा