मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आता मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद वाढताना दिसत आहे. रविवारी हिंगोली येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
दरम्यान, रविवारी रात्री छगन भुजबळ हे पुण्यातील शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला होते. सोमवारी सकाळी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच भुजबळ यांची गाडी फोडण्याचा इशाराही त्यांनी दिला. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते, असं स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव म्हणाले.
हेही वाचा- “शिंदे समिती रद्द करावी किंवा त्यांनी राजीनामा द्यावा”, बच्चू कडूंचं भुजबळांना खुलं आव्हान
त्यानंतर भुजबळ समर्थक कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि अपशब्द वापरले. मराठा आणि भुजबळ समर्थक कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे पुण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
राज्यात कायद्याचं राज्य आहे. आम्ही असल्या धमक्या खपवून घेणार नाही. आम्ही पूर्णपणे छगन भुजबळांच्या पाठिशी आहोत. ज्यांनी भुजबळांच्या गाडी फोडण्याची धमकी दिली, त्यांचा भटक्या विमुक्त आणि ओबीसी आरक्षण समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया एका भुजबळ समर्थक पदाधिकाऱ्याने दिली.