घरगुती चवीचे पदार्थ ग्राहकाच्या घरी पुरवणाऱ्या ‘हाऊसखास’ या ‘ऑनलाइन पोर्टल’ने गेल्या दीड वर्षांत पुणेकर खवय्यांची उत्तम दाद मिळवली आहे. बाहेर कुठे सहजासहजी चाखण्यास न मिळणारे पदार्थ हे संकेतस्थळ पुरवते. विशेष म्हणजे ते व्यावसायिक ‘शेफ्स’नी नव्हे, तर घरगुती स्तरावर काम करणाऱ्या सुगरण स्त्रियांनी बनवलेले असतात. पुण्यात सगळीकडे सेवा पुरवणारे हे संकेतस्थळ टिकाऊ पदार्थ अमेरिकेतही पुरवते, तसेच आता ते मुंबईतही विस्तार करत आहेत.
पुण्यात रेस्टॉरंट्स अजिबात कमी नाहीत. देशपरदेशातील वेगवेगळ्या प्रांतांचे पदार्थ बनवणारी स्वतंत्र रेस्टॉरंट्स देखील खूप आहेत. असे असले तरी काही विशिष्ट पदार्थ मात्र रेस्टॉरंट्समध्ये मिळत नाहीत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येणारे असे अनेक पदार्थ खायचे असतील, तर एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणूनच जावे लागेल. ‘हाऊसखास’ नावाच्या एका नवीन ‘स्टार्ट अप’ संकेतस्थळाने असे घरगुती पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध करून दिलेत.
शर्मिला भिडे यांनी हे संकेतस्थळ सुरू केले. शर्मिला आणि त्यांच्या यजमानांची ‘कॅलसॉफ्ट’ ही सॉफ्टवेअर कंपनी आहे. पण भिडे यांना वेगवेगळे पदार्थ करून पाहण्याची खूप आवड आहे. दोन वर्षांपूर्वी एका रविवारी त्या भाजीखरेदीसाठी गेल्या असताना एक गृहिणी गुजराती उंधीयूसाठी लागणाऱ्या भाज्या निवडून घेत असल्याचे त्यांनी पाहिले. शर्मिला यांना तोपर्यंत कधी अस्सल गुजराती उंधीयू खायला मिळाला नव्हता. त्यातून घरगुती स्तरावर कोण उंधीयू बनवून देते याचा शोध सुरू झाला. फक्त उंधीयूच नव्हे तर वेगवेगळ्या प्रांतातील असे अनेक पदार्थ फक्त घरगुती स्वरूपातच चाखायला मिळतात. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये सहसा न मिळणारे असे पदार्थ ग्राहकांना ‘ऑनलाइन’ मागणी नोंदवून उपलब्ध झाले तर, असा विचार शर्मिला यांच्या मनात आला आणि ‘हाऊसखास’ या संकेतस्थळाची कल्पना समोर आली. रेस्टॉरंटमध्ये मिळणारे नेहमीचे पदार्थ या संकेतस्थळावर नकोत, हेही ठरले. मग खास पदार्थ बनवून देणाऱ्या उत्साही सुगरणींना शोधून काढून त्यांच्या साहाय्याने गेल्या वर्षी जानेवारीत हे संकेतस्थळ सुरू झाले.
नुसते चवदार पदार्थ बनवणे आणि मागणी येईल तसे ते बनवून देणे यात फरक असतो. लहान प्रमाणात ‘केटरिंग’चा व्यवसाय करणाऱ्या काही स्त्रियांना मागणीनुसार पदार्थ बनवण्याची जाण होती. व्यवसायाचा अजिबात अनुभव नसलेल्या, पण हाताला चव असलेल्या स्त्रियांना मात्र पदार्थासाठी लागणारा वेळ, त्याच्या किमतीचे गणित याविषयी अनेक गोष्टी सांगाव्या लागल्या, असे शर्मिला सांगतात. संकेतस्थळावरील पदार्थाचा ‘मेन्यू’ तयार करतानाही विशेष प्रयत्न करावे लागले. प्रत्येक पदार्थ आधी स्वत: चाखून पाहून, तो पदार्थ कसा विशेष आहे, हे पाहून हा मेन्यू तयार झाला. केवळ महाराष्ट्रीय आणि गुजरातीच नव्हे, तर काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत आणि दक्षिण भारतापासून पूर्व किनाऱ्यावरील राज्यांपर्यंत बनवले जाणारे पदार्थ आणि परदेशी पदार्थही बनवणारे पन्नासहून अधिक ‘शेफ’ ‘हाऊसखास’बरोबर काम करतात. यातील २५ ते ३० शेफ कोणत्याही वेळेस सक्रिय असतात. हे शेफ मूळचे व्यावसायिक नाहीत. ते ‘होम कुक’ आहेत. त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार ते बनवून देत असलेल्या पदार्थाची उपलब्धता बदलते. या पदार्थाची मागणी आधी नोंदवावी लागते. या शेफना पदार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे प्रमाण आणि पदार्थ डब्यात वेष्टनीकृत करण्याची पद्धत ठरवून दिली आहे, तर त्यांच्याकडून पदार्थ घेऊन तो ग्राहकाकडे पोहोचवण्यासाठी वेगळी ‘डिलिव्हरी टीम’ आहे. त्यामुळे पुण्यात वाकडपासून कात्रजपर्यंत कुठेही त्याचे पदार्थ मागवता येतात. ‘‘ग्राहकाला पदार्थ मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना संकेतस्थळावर जाऊन आपला अभिप्राय देता येतो. ग्राहकाने काहीही अभिप्राय लिहिला, तरी त्यात आमच्याकडून काही बदल केला जात नाही. पदार्थ बनवणाऱ्यालाही त्या अभिप्रायाची एक प्रत पाठवली जाते,’’ असे शर्मिला सांगतात.
गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे सध्या ‘हाऊसखास’कडे उकडीच्या मोदकांच्या मागण्या मोठय़ा प्रमाणावर येतात. नुकत्याच झालेल्या रमजानच्या निमित्ताने ‘हलीम’ या वैशिष्टय़पूर्ण पदार्थाचे विविध प्रकार त्यांनी उपलब्ध करून दिले होते. गेल्यावर्षी ख्रिसमससाठीचे पारंपरिक केक त्यांनी गोव्याच्या ‘होम कुक’कडून बनवून घेतले होते. कोल्हापुरी आणि मालवणी पदार्थाना या संकेतस्थळावर कायम मागणी असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी विस्मृतीत गेलेले मोती पुलाव, नर्गिसी कोफ्ता असे पदार्थ आणले. ‘हाऊसखास’च्या सर्वच पदार्थाच्या किमती मात्र नेहमी रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थापेक्षा अधिक आहेत. परंतु हे पदार्थ मोठय़ा प्रमाणावर बनवून न ठेवता मागणीनुसारच तयार केले जात असल्यामुळे हा फरक असल्याचे शर्मिला सांगतात. खवय्यांबरोबर ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांच्या विशेष बैठकींसाठी, तसेच लहान समारंभांसाठीही ते पदार्थाच्या मागण्या पुरवतात.
सध्या हे संकेतस्थळ केवळ पुण्यात पदार्थ पुरवते. पण या गणेशोत्सवात विशेषत: उकडीच्या मोदकांसाठी ते मुंबईत विस्तार करणार आहेत. त्यासाठी मुंबईतील काही ‘होम कुक’ना संस्थेबरोबर जोडून घेण्यात आले आहे. लवकर खराब न होणाऱ्या चटणी, लोणचे, भाजण्या, फराळाचे पदार्थ, गोडाच्या पोळ्या, तळलेले सुके मोदक असे पदार्थ करून घेऊन अमेरिकेतील ग्राहकांनाही पाठवले जातात. यापुढेही संकेतस्थळाचे वेगळेपण जपून विस्तार करण्याचा विचार असल्याचे शर्मिला सांगतात.
sampada.sovani@expressindia.com