केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहरातील पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची जी योजना महापालिका राबवत आहे, त्या योजनेत पथारीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणाच्या प्रभागनिहाय याद्या नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच फेरीवाला समितीच्या बैठकांचे इतिवृत्तान्त महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य अमेय जगताप यांनी ही मागणी एका निवेदनाद्वारे बुधवारी केली. महापालिकेतर्फे अधिकृत पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या या याद्या नागरिकांनाही माहिती होणे आवश्यक आहे. या याद्या महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. या व्यावसायिकांना कोणत्या व्यवसायासाठी परवाना दिला आहे याचीही माहिती मिळणे आवश्यक आहे. तसेच पुनर्वसन करताना शहर फेरीवाला समितीने काही अटी घातल्या असतील, काही नियम ठरवले असतील तर त्यांचीही माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. शहरातील पदपथांवर तसेच सायकल मार्गावर या व्यावसायिकांचे पुनर्वसन करा असे या समितीने सांगितले होते का, याचाही खुलासा झाला पाहिजे, असे जगताप यांचे म्हणणे आहे.
पुनर्वसनाचा विषय वाहतूक, स्वच्छता, अतिक्रमण आदी अनेक विभागांशी संबंधित आहे. पथारीवाल्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांचा तो हक्क आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे. तशी ठेवली गेली, तर महापालिकेला एकदा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घ्यावा लागणार नाही, असेही जगताप यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader