मोठा गाजावाजा करत पिंपरी महापालिकेने टपरी, हातगाडी व पथारीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. मात्र, ती कारवाई कागदावर राहिल्याचे चित्र पुढे आले आहे.
‘स्मार्ट सिटी’संदर्भात आयोजित बैठकीत या ‘दिखावू’ कारवाईवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेव्हा आयुक्त राजीव जाधव यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. अनधिकृत टपऱ्यांवर तातडीने कारवाई करा. सध्याच्या परिस्थितीत बदल न झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांवरच कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेची माहिती नगरसेवकांना देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या या बैठकीस महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, गटनेते सुलभा उबाळे, सुरेश म्हेत्रे, अनंत कोऱ्हाळे, माजी महापौर अपर्णा डोके आदी नगरसेवक उपस्थित होते. बहुतांश नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना तसेच गृहनिर्माण प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीतील चर्चेत सदस्यांनी शहरभरातील अनधिकृत पथारीवाले तसेच टपऱ्यांमुळे होणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधले. थेरगाव, संभाजीनगर, भोसरी, चिंचवड, इंद्रायणीनगर, भोसरी आदी भागातील दाखलेही दिले. सर्व चर्चेचा परामर्ष घेताना आयुक्तांनी कारवाईच्या सध्याच्या स्वरूपावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अधिकृत पथारीवाल्यांसाठीचे धोरण सभेत ठरवण्यात येईल. मात्र, रस्ता अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत सर्व प्रकल्पांची संकलित माहिती संगणक अधिकारी नीलकंठ पोमण यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा