राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाला शहरात सोमवार (१० फेब्रुवारी) पासून सुरुवात होत असून दीड महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. त्यानंतर संबंधितांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. फेरीवाला समितीने घेतलेल्या सर्व निर्णयांची म्हणजेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शहरात १ एप्रिलपासून केली जाईल.  
महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी गुरुवारी ही माहिती दिली. शहर फेरीवाला समितीची बैठक महापालिकेत बोलावण्यात आली होती. आयुक्त महेश पाठक, पोलीस उपायुक्त मकरंद रानडे तसेच स्वयंसेवी संस्थांचे आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. फेरीवाला धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास किती दंड आकारावा याबाबत जे निर्णय घेण्यात आले होते त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्यावेळी संबंधित व्यावसायिकाला समज दिली जाईल. त्यानंतरही पुन्हा तशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन झाले, तर एक हजार रुपये दंड आकारला जाईल. एकदा दंड झालेल्या व्यावसायिकाने पुन्हा नियमभंग केल्यास त्याला पाच हजार रुपये दंड केला जाईल. व त्यानंतरही नियमभंग केल्यास व्यावसायिकाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल.
शहरातील जे पंचेचाळीस रस्ते व्यवसायासाठी बंद करण्यात आले आहेत, त्या रस्त्यांच्या आतील बाजूस व्यावसायिकांना जागा देण्याबाबत विचार केला जात आहे. अशा जागांची यादी संघटनांनी द्यावी, असेही संघटनांना कळवण्यात आले आहे. ओळखपत्र मिळण्यासाठीचा अर्ज शंभर रुपयांना उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नोंदणीसाठी तीनशे रुपये आकारले जातील आणि ओळखपत्रासाठी दोनशे असे पाचशे रुपये आकारावेत असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. पथारीवाल्यांची नोंदणी सोमवारपासून सुरू केली जाणार असून शहराच्या चार विभागात हे काम सुरू होईल.
सर्व स्टॉलसाठी आकाराचे बंधन
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ मार्चपूर्वी शहरातील पथारी व्यावसायिक, स्टॉलचालक आणि फेरीवाल्यांना एक मीटर गुणिले एक मीटर एवढय़ाच जागेत व्यवसाय करता येणार आहे. त्यामुळे तो पर्यंत सर्व व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाची जागा त्याच मर्यादेत ठेवावी लागेल. शहरातील सर्व दूध सरिता स्वरुपातील स्टॉल आणि रसाची गुऱ्हाळे यांच्यासाठी दोन मीटर गुणिले दोन मीटर एवढी जागा निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील दीडशे दूध सरिता व छत्तीस गुऱ्हाळांना या आकारात त्यांचा व्यवसाय बसवावा लागेल.