‘हॅझार्ड मॅप’ची निर्मिती; ‘आयसर पुणे’च्या संशोधन गटाचे संशोधन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : भविष्यातील साथरोगांचा वेध घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी ‘हॅझार्ड मॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) संशोधन गटाने देशातील सुमारे ४५० शहरांचा अभ्यास करून कोणत्या शहरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा अधिक धोका आहे, याचा नकाशा विकसित केला आहे.

करोना संसर्गाने गेले दीड वर्ष जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची विषाणूजन्य साथ येऊ नये, आल्यास ती रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार संशोधकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयसर पुणेतील संशोधन गटाने हॅझार्ड मॅप विकसित केला आहे. संशोधन गटामध्ये जी. जे. श्रीजित, सचिन जैन, एम. एस. संथानम, ओंकार साडेकर, मानसी बुडामागुंठा यांचा समावेश आहे. या संशोधनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्ब योजनेंतर्गत निधी मिळाला होता.

हॅझार्ड मॅपविषयी माहिती देताना एम. एस. संथानम म्हणाले, की विषाणू संसर्गाचा उद्रेक देशातील एखाद्या शहरात झाल्यास त्या शहरातून किती प्रवासी अन्य शहरांत ये-जा करतात त्यावर संसर्गाचे पसरणे अवलंबून आहे. संसर्ग पसरण्यासाठी शहरे भौगोलिकदृष्ट्या किती जवळ आहेत हे महत्त्वाचे नाही. तर हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गाने जी शहरे मोठ्या प्रमाणात जोडलेली आहेत, त्या शहरांना संसर्गाचा धोका जास्त आहे. कारण प्रवासातून संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. त्याशिवाय विषाणू किती संसर्गजन्य आहे, त्यावरही संसर्ग पसरण्याचे प्रमाण अवलंबून आहे. त्यामुळे हॅझार्ड मॅपद्वारे संसर्ग कसा आणि किती पसरू शकतो याची प्राथमिक कल्पना येऊ शकते आणि त्याद्वारे आवश्यक त्या उपाययोजना करता येऊ शकतात.

उपलब्ध झालेल्या विदानुसार हा नकाशा तयार करण्यात आला. त्यासाठी खास अल्गोरिदम विकसित करावा लागला. आणखी विदा उपलब्ध झाल्यास हॅझार्ड मॅप अधिक प्रभावी पद्धतीने वापरता येऊ शकतो, असे ओंकार साडेकर यांनी सांगितले. अधिक माहिती http://www.iiserpune.ac.in/~hazardmap//  या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

महत्त्व काय?

हा नकाशा तयार करण्यासाठी १ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येची देशभरातील सुमारे ४५० शहरे-निमशहरे, प्रवासाची साधने, प्रवाशांचे प्रमाण असे घटक विचारात घेण्यात आले. संसर्ग कसा आणि किती पसरतो याची माहिती या नकाशाद्वारे होऊ शकते. त्यानुसार नियंत्रणासाठी उपाय करता येऊ शकतात.

धोका असलेली दहा शहरे

देशात सर्वाधिक धोका असलेल्या देशांतील पहिल्या दहा शहरांमध्ये राज्यातील मुंबई आणि पुणे या शहरांचा क्रमांक लागतो. पहिल्या दहा शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळूरु, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ, झाशी आणि पुणे या शहरांचा समावेश होतो, असे ओंकार साडेकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hazard maps by iiser pune for infectious disease control zws