पुणे पोलिसांना अनेक दिवसांपासून हव्या असलेल्या फरार गुन्हेगारांची यादी एक वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात आली.. या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली अन् दैनंदिन जबाबदारी सांभाळून रात्री या गुन्हेगारांचा शोध सुरू झाला.. स्वत:हून उत्साहाने स्वीकारलेल्या या जबाबदारीने आता एकूणच पुणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. कारण, अनेक दिवसांपासून फारार असलेले शंभर गुन्हेगार एका वर्षभरात त्यांनी पकडून दिले. पोलीस नाईक महेश निंबाळकर, असे ही विक्रमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे!
निंबाळकर हे सध्या डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यातील दैनंदिन जबाबदारी, बंदोबस्त आदी सर्व सांभाळून व स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा वापरून निंबाळकर यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांच्यावर पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत निंबाळकर यांना पुणे पोलीस आयुक्तालयाकडून डेक्कन पोलिसांना पाठविलेली फरार गुन्हेगारांची यादी मिळाली. ही यादी त्यांनी केवळ वाचलीच नाही, तर फरार गुन्हागारांची इतर माहितीही त्यांनी काढली. डेक्कनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी निंबाळकर यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
फरार गुन्हेगारांबाबत माहिती काढल्यानंतर दैनंदिन काम संपल्यानंतर रात्री या गुन्हेगारांचा शोध निंबाळकर यांनी सुरू केला. सहकारनगर पोलिसांना गुंगारा देणारा शशी गोिवद आरवाडी (कुंभार) हा पहिला फरार गुन्हेगार त्यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये पकडला. हा त्यांनी पकडलेला पहिला गुन्हेगार होता. तब्बल ३६ वर्षे फरारी असलेला वाकडेवाडी येथील प्रभाकर कांबळे हाही निंबाळकर यांच्या हाती लागला. त्यानंतर फरार गुन्हेगार शोधण्याचे सत्र सुरू ठेवत निंबाळकर यांनी एकापाठोपाठ एक गुन्हेगार पुणे पोलीस दलाला पकडून दिले. मीरा बोरवणकर या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना निंबाळकर यांना या कामगिरीबद्दल त्यांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले. त्यामुळे इतक्या मोठय़ा रकमेचे बक्षीस मिळविणारे निंबाळकर हे पुणे पोलीस दलातील पहिलेच कर्मचारी ठरले. यापूर्वीही या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत असताना निंबाळकर यांनी फरार गुन्हेगार पकडण्याचे आता शतकच पूर्ण केले.
निंबाळकर यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी म्हणाले, की निंबाळकर यांनी पुणे शहर, ग्रामीण व सांगलीतील फरार गुन्हेगारांना पकडले आहे. या कामगिरीमागे त्यांची चिकाटी व मेहनत आहे. त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे.