राजीनाम्याच्या मागणीवर सर्वजण ठाम असतानाही ते निर्लज्जम् सदासुखीसारखे पदावरच राहिले आहेत. आता त्यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारच निर्णय घेतील. कारण ते जाणता राजा आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अजित पवार यांच्यावर कडवी टीका केली. आबा, दादा ही विशेषणे लावायच्या लायकीचा एक तरी माणूस राज्यकर्त्यांमध्ये राहिला आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आदित्य प्रतिष्ठानतर्फे यंदाचा ‘लक्ष्मी-वासुदेव राष्ट्रभूषण पुरस्कार’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्वीकारला. या कार्यक्रमातील भाषणात आणि कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासह राज्यकर्त्यांना लक्ष्य केले. प्रतिष्ठानचे संस्थापक विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर, दाजीकाका गाडगीळ, अपर्णा अभ्यंकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
अजित पवार यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सर्वजण ठाम असताना ते पदावर निर्लज्जम सदासुखी सारखे थांबले आहेत. त्यामुळे जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असे ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांनी केलेल्या त्या विधानांची लाज वाटते. आपण पूर्वी रामराज्य म्हणायचो, सुराज्य म्हणायचो, त्या सु या शब्दाचा अर्थ यांनी आता काय केला आहे? कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीला आपण आबा, दादा म्हणतो. काही अडचण आली, दुखले, खुपले, तर त्यांच्याकडे जातो. काही गरज पडली, तर त्यांच्याकडे मागतो. आबा, दादा म्हणजे घरातील हक्काचा माणूस. आज लोक त्यांच्याकडे पाणी मागायला गेले, तर त्यांनी काय विधाने केली? आबा, दादा ही विशेषणे लावायच्या लायकीचा एक तरी माणूस राज्यकर्त्यांमध्ये आहे का?
कधी येणार गुढीपाडवा?
 आपण आज गुढी उभारून आनंद साजरा करत आहोत; पण आपण खरोखरच सुखी, समाधानी, आनंदी आहोत का? राज्यातला काळोख कधी संपणार माहिती नाही. मला आज प्रतिकरूपाने गुढी देण्यात आली आहे. ही गुढी मी पुन्हा सोन्याची करीन आणि विधानसभेवर लावीन. ते शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते. त्यांना अभिमान वाटेल असेच काम मी करून दाखवीन. कितीही संकटे आली तरी ही गुढी विधानसभेवर लावणारच, असाही विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रतिष्ठानच्या अपर्णा अभ्यंकर तसेच डॉ. गोऱ्हे यांचीही यावेळी भाषणे झाली. उद्धव ठाकरे यांना चैतन्याचे, मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी दिली आहे आणि ही गुढी परिवर्तनासाठीही दिली आहे, असे मनोगत शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले. श्रीकांत आठवले यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा