खबरे म्हणजे पोलिसांचे नाक, कान, डोळे. खबऱ्यांच्या माहितीवर पोलीस गु्न्हेगारांचा शोध घेतात. खबऱ्याने दुसऱ्या पोलिसाला माहिती दिल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने त्याला शिवीगाळ करुन धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेतील पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा >>> विधवा ऐवजी पूर्णांगी शब्द वापरण्यात यावा; राज्य महिला आयोगाची राज्य सरकारकडे शिफारस
दीपक शिवराम लांडगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. लांडगे गुन्हे शाखेच्या युनिट पाचमध्ये नियुक्तीस आहेत. एका खबऱ्याने आरोपीविषयीची माहिती लांडगे यांना न देता त्यांच्या सहकाऱ्याला दिली होती. हा प्रकार समजल्यानंतर लांडगेंनी खबऱ्याला गाठले आणि त्याला शिवीगाळ करुन धमकावले. एवढ्यावरच न थांबता लांडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. लांडगे यांची वर्तन अशोभनीय आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे समाजात चुकीचा संदेश गेल्याचा ठपका ठेवून लांडगे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त झेंडे यांनी दिले.