देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांचे रविवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहकांच्या हक्कांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करून देशभरातील ग्राहकवर्गाला संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा प्राण असून, देशाच्या विकासासाठी ग्राहकशक्ती उभारणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे बिंदुमाधव जोशी यांचे मत होते. त्यांना सरकारकडून “फादर ऑफ कंझ्युमर मूव्हमेंट ऑफ इंडिया’ असे संबोधून गौरविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे स्वतंत्र ग्राहक प्राधिकरण आणि ग्राहक कल्याणकारी विभागाची स्थापना झाली.
२५ सप्टेंबर १९३१ रोजी पुणे येथे बिंदुमाधव जोशी यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातदेखील जोशी यांचे अमुल्य योगदान होते. त्यांनी १९५४मध्ये दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज राजवटीविरुद्ध झालेल्या शसस्त्र उठावात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी आणि तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठीच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. याचदरम्यान, ते जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले. बिंदुमाधव जोशी यांच्या ‘नवनिर्माण चळवळी’चे कार्य पाहून जयप्रकाश नारायण चांगलेच प्रभावित झाले होते. नंतर जेव्हा १९७४मध्ये बिंदुमाधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केली तेव्हा जयप्रकाश नारायण उद्घाटनाला आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा