पुणे : देशभरात कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग आणि त्याच्या लक्षणांविषयी फारशी माहिती नसते. त्यामुळे आरोग्य विभागाने फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग तपासणी सुरू केली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत ७ हजार ३८५ जणांची तपासणी झाली असून, त्यातील ३७ जणांना कर्करोगाचे निदान झाले आहे.
आरोग्य विभागाने पुणे विभागात ९ फेब्रुवारीला बारामतीतील महिला रुग्णालयापासून फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग तपासणी मोहीम सुरू झाली. यात प्रामुख्याने मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जात आहे. या व्हॅनमध्ये रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, दंत शल्य चिकित्सक आणि इतर प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तपासणी झालेल्या रुग्णांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी नजीकच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात येते. रुग्णालयात या रुग्णांचे कर्करोगाचे निश्चित निदान केले जाते.
राज्यात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाचा कर्करोगाचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत. यामुळे या तिन्ही कर्करोगांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण ७ हजार ३८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात मुखाच्या कर्करोगासाठी ३ हजार २१८३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९ जणांना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि त्यात एकाला कर्करोगाचे निदान झाले. स्तनाच्या कर्करोगासाठी २ हजार ३०५ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यातील ७३ जणींना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि त्यात १५ जणींना कर्करोगाचे निदान झाले. गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी १ हजार ८९७ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यातील ७२ जणींना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि त्यात २१ जणांना कर्करोगाचे निदान झाले.
जिल्ह्यातील कर्करोग तपासणी
प्रकार | तपासणी | संशयित | निदान |
मुखाचा कर्करोग | ३,१८३ | ९ | १ |
स्तनाचा कर्करोग | २,३०५ | ७३ | १५ |
गर्भाशय मुखाचा कर्करोग | १,८९७ | ७२ | २१ |
एकूण | ७,३८५ | १५४ | ३७ |
ग्रामीण भागात कर्करोगाविषयी फारशी जागरूकता नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांची कर्करोग तपासणी सुरू केली आहे. यातच धर्तीवर शहरातील झोपडपट्टी भागात लवकरच तपासणी सुरू केली जाणार आहे. डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग