पिंपरी : ‘सरकारच्या प्रत्येक विभागाचे कामकाज पारदर्शक, योग्य पद्धतीने आणि नियमित व्हावे अशी नागरिकांसह आरोग्यमंत्री म्हणून माझीही अपेक्षा आहे. कोणतीही गोष्ट योग्य पद्धतीने होण्यासाठी चौकशी केली जाणार असेल, तर काही बिघडणार नाही. त्याबाबत आनंद, दुःख व्यक्त करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे, लोकहिताची व्हावी, यासाठी प्रत्येकाने आग्रह धरला पाहिजे’, अशी भूमिका आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील चौकशीबाबत मांडली.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवीत आयोजित केलेल्या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराला मंत्री आबिटकर यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आरोग्य विभागातील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या निर्णयावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत विचारले असता मंत्री आबिटकर म्हणाले की, ‘कोणत्याही खात्याची चौकशी करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामध्ये काही गैर नाही. पारदर्शी कारभारासाठी चौकशीचे आदेश दिले असतील तर त्याचे दुःख व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. तो निर्णय स्वागतार्ह आहे. कोणतीही गोष्ट योग्य पद्धतीने होण्यासाठी चौकशी केली जाणार असेल तर काही बिघडणार नाही’.

१४ वर्षांपर्यंतच्या मुलींना कर्करोगाची लस

‘भविष्य काळात होणाऱ्या कर्करोगाच्या संभाव्य धोक्यापासून मुलींना वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी ० ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोगाची लस दिली जाणार आहे. या लशीची उपलब्धतता राज्य शासन करून देईल. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पात करतील. नवीन पिढीसाठी हे महत्वपूर्ण काम होणार असल्याचेही’ आबिटकर म्हणाले.

आरोग्य चांगले असेल तर सर्वकाही आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा सर्व मिळेल पण आपले आरोग्य आपल्या हातात नाही. ते परत मिळणार नाही. त्यामुळे आरोग्य जपले पाहिजे. प्रगती आणि आरोग्य सांभाळावे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Story img Loader