पुणे : ‘आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी कार्यालयीन शिस्त पाळत नाहीत. काही अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करतात, अशा तक्रारी येत आहे. अशा अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आल्यास त्यांना निलंबित केले जाईल,’ असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिला.
आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या पुण्यातील विविध कार्यालयांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. कैलास बाविस्कर उपस्थित होते. आरोग्य विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी आरोग्यमंत्र्यांसमोर करण्यात आल्या. त्यावर आरोग्यमंत्री म्हणाले, ‘आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी शिस्त पाळायला हवी. अधिकारी काम करीत नसतील, तर त्यांना दया दाखविण्याची गरज नाही. सरकार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांना पगार देत आहे. एका बाजूला नोकरी नाही म्हणून लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत, दुसरीकडे शासनाच्या सेवेत असलेल्या लोकांना चांगले काम करण्याची संधी मिळतच आहे.’
हेही वाचा – वाल्मीक कराडला तुरुंगात ‘व्हीव्हीआयपी’ वागणूक? मुख्यमंत्री म्हणाले…
‘आरोग्य विभागातील एखाद्या अधिकाऱ्याने दहा टक्के चूक केली, तर त्याला ती दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल. परंतु, एखाद्याची मानसिकताच चूक करण्याची असेल, तर शिक्षा ही व्हायलाच हवी. तुमचे काम योग्य असेल तर ठीक; अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता आणायला हवी. कामात पारदर्शकता असेल, तर त्याबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत,’ असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाबाबत तक्रारी आल्यास त्यांचे निलंबन केले जाईल. मी आमदार म्हणून काम करताना विधिमंडळात अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सर्वाधिक मागण्या केल्या होत्या. त्यामुळे यापुढे कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री