लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे काम पाहत आहेत. अपघात प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्याचे कामकाज बाल न्याय मंडळाकडून पाहण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल, त्याची पत्नी शिवानी यांनी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याशी संगनमत करुन रक्ताचे नमुने बदलले होते. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अगरवाल दाम्पत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, तसेच अन्य आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अगरवाल दाम्पत्यासह अन्य आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शिवाजीनगर न्यायालयात लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

कल्याणीनगर भागात अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी आजोबा बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार अगरवाल, वडील विशाल यांनी मोटारचालकाला धमकाविले होते. अपघाताच्या वेळी मोटार मुलगा चालवित नव्हता, तसेच मुलाने मद्यप्राशन केले नव्हते, यासाह मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना धमकाविले होते. हेरीक्रुब यांना धमकावून अगरवाल यांनी वडगाव शेरीतील बंगल्यात डांबून ठेवले होते. हेरीक्रुब यांचे अपहरण करून धमकाविल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आणखी एक गु्न्हा दाखल झाला होता.

बोपदेव घाट प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोपदेव घाट प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ॲड. पवार यांनी महत्त्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

एप्रिल महिन्यात साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन नष्ट

पुणे पोलिसांनी जप्त केलेले साडेसात कोटी रुपयांचे अमली पदार्थ २५ मार्च रोजी नष्ट करण्यात येणार आहेत. कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीत छापा टाकून पोलिसांनी तीन हजार ६७४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. कुरकुंभ प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोन एप्रिल महिन्यात नष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

Story img Loader