पुण्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम असूनही उकाडासुद्धा टिकून होता. मात्र, ढगांचे मळभ असल्याने राज्याच्या अनेक भागात दुपारच्या तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात परभणी येथे सर्वाधिक ४१.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले.
पुण्यात मतदानाच्या दिवशी, गुरुवारी भयंकर उकाडा जाणवत होता. ३८.७ अंशांचे कमाल तापमान आणि हवेत मोठय़ा प्रमाणात बाष्प असल्यामुळे जास्त उष्मा जाणवत होता. पुण्यात गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीसुद्धा हवेत बाष्प कायम होते. तसेच, तापमानही ३८.५ अंशांवर होते. लोहगाव येथे तर तापमान ३८.९ अंशांवर होते. त्यामुळे ढगाळ वातावरणातही उकाडा अनुभवायला मिळाला. पुण्यात ही स्थिती असली, तरी राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणामुळे दुपारच्या तापमानात मोठी घट झाली. विशेषत: मराठवाडा व विदर्भात हा बदल पाहायला मिळाला. राज्यात काही ठिकाणी गुरुवारी ४३-४४ अंशांपर्यंत उकाडा होता. हे तापमान खाली उतरले. परभणी येथे शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. ते ४१.४ अंश सेल्सिअस होते.
पुण्याच्या आसपासच्या शहरांमध्येही तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. नगर, सोलापूर येथे ४० अंशांच्या वर असलेला पारा शुक्रवारी खाली उतरला. नगर येथे ३९.५ अंश, तर सोलापूर येथे ३७.३ अंशांच्या कमाल तापमानाची नोंद झाली. अशीच स्थिती सातारा (३८.१ अंश), सांगली (३७), नाशिक (३६.१) येथेही होती.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे. या काळात दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजा चमकण्याचीसुद्धा शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा