पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक ५ रुग्णांची नोंद बुलढाण्यात झाली असून, पुण्यातही ३ रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात १ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी केवळ १ निश्चित निदान झालेला रुग्ण होता. यंदा राज्यात सर्वाधिक ५ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर अमरावती आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी ४ रुग्ण, पुणे, नाशिक, ठाण्यात प्रत्येकी ३ रुग्ण, अहमदनगर, बीड, परभणी, रायगड, सोलापूरमध्ये प्रत्येकी २ रुग्ण, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, नांदेड, रत्नागिरी, सातारा प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

याबाबत आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले की, राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना त्याबाबत उपचाराचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी

उष्माघाताचा धोका

मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.

हेही वाचा – अजितदादांच्या चिरंजीवाने निवडणूक लढविलेल्या मावळातून ‘घड्याळ’ हद्दपार !

उष्माघाताची लक्षणे

  • चक्कर येणे
  • उलटी अथवा मळमळणे
  • डोकेदुखी
  • खूप तहान लागणे
  • लघवीला कमी होणे
  • हृदयाचे ठोके वाढणे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat stroke crisis in maharashtra state find out where the risk has increased the most pune print news stj 05 ssb