पुणे : शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेला उष्मा असे वातावरण आणखी काही दिवस सहन करावे लागणार आहे. सध्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली असून, पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसा असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांमुळे वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी शिवाजीनगर येथे ४१.२, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.८, हडपसर येथे ४०.२, चिंचवड येथे ३९.१, एनडीए येथे ३८.९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर गुरुवारी शिवाजीनगर येथे ४०.१, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.१, पाषाण येथे ४०, हडपसर येथे ३९.९, चिंचवड येथे ३८.६, एनडीए येथे ३८.२ अंश सेल्सियस तापमान होते.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तरेकडील राज्यांत वाढलेले तापमान, तिकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होत आहे. उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. २२ एप्रिलनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान ढगाळ होण्याची, तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.’