पुणे : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात दीड ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. शनिवारी सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. राज्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली. त्याखालोखाल अमरावती ४३.८, बुलढाणा ४०.०, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमान होते.
हेही वाचा – ऊन, पाणी आणि माढा !
मराठवाड्यात परभणीत ४३.६, औरंगाबादमध्ये ४१.६, बीडमध्ये ४३.१ अंश तापमान होते. मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४३.४, सांगली ४१.६, सातारा ४०.९, जळगावात ४२.३ आणि मालेगावात ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. किनारपट्टीवर डहाणूत ३५.८, कुलाब्यात ३३.२ आणि रत्नागिरीत ३३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांत पारा चाळीशी पार गेला होता.
हेही वाचा – पौड रस्त्यावर थरार, भरधाव पीएमपीची तीन वाहनांना धडक
विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी
हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.