पुणे : मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज, बुधवारी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उन्हाळा सर्वोच्च अवस्थेत पोहोचला आहे. उत्तर भारत, गंगा नदीचे खोरे, दक्षिण भारतात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थानवरून उष्ण वारे किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातून राज्यात येत आहे. तसेच राज्याच्या वातावरणात तीन ते सात किलोमीटर अंतरावर प्रति चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे वातावरणातील उष्ण वारे जमिनीकडे दाबले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिणामी मुंबईसह उत्तर किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. दिवसभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागू शकतो, तसेच रात्रीही असह्य उकाडा जाणविण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन-चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील करणार घरुन मतदान

सोलापुरात पारा ४४ अंशांवर

राज्यात मंगळवारी सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोलापुरात झाली. मध्य महाराष्ट्रात जळगाव, मालेगाव ४३ अंशांवर, नगर, सातारा ४१ अंशांवर, सांगली ४२ अंशांवर तर महाबळेश्वरात ३५.१ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात नागपूर ४१.४, अकोला ४३.९, अमरावती, चंद्रपूर ४२.८ अंश तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये ४०.८ आणि परभणीत ४१.६ अंश तापमान होते. किनारपट्टीवर अलिबाग ३३.९, डहाणू ३५.०, कुलाबा ३४.१ आणि रत्नागिरीत ३५.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

हेही वाचा : आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलास आता पुण्यातूनही आव्हान, न्यायालयात जनहित याचिका

२२ जिल्ह्यांत उष्णतेची लाट

मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण २२ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दमट वातावरणामुळे किनारपट्टीवर असह्य उकाडा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heatwave in maharashtra for next three days weather update of mumbai and central maharashtra pune print news dbj 20 css