इंदापूर : रब्बी हंगामातील गव्हाचे पीक परिपक्व झाले असून महाशिवरात्रीनंतर गव्हाच्या पिकाची काढणी व मळणला वेग येईल. मात्र, त्यापूर्वीच हुरड्यात असलेल्या गव्हाच्या पिकावर पक्ष्यांचे जोरदार आक्रमण झाले असून त्यांच्याकडून गव्हाचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर जिल्हा हा आगर मानला जातो. मात्र अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणामध्ये बदल केल्यामुळे शेतकरी ज्वारीच्या पिका ऐवजी ऊस, केळी ,डाळिंब व अन्य तरकारी पिके घेऊ लागल्यामुळे निसर्गामध्ये विमुक्त संचार करून मिळेल तिथे अन्य शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्ष्यांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे.
या परिसरातील ज्वारीच्या पिकाचे मोठे क्षेत्र घटल्यामुळे गव्हाचे पीक हुरड्यात येण्यापूर्वी रब्बी हंगामात पारंपारिक ज्वारीच्या पीकावर पाहुणचारासाठी येणाऱ्या स्थानिक स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांनी काही काळ आपला मोर्चा अक्षरशः उजनी धरणाच्या आश्रयाने ‘उजनी’ काठी वळवला होता. त्या ठिकाणी कीडा कृमी कीटक तसेच पाणलोट क्षेत्रामध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेल्या झाडांचा आधार घेत पाण्याच्या परिसरातील कीटकांना भक्षस्थानी करत आपला उदरनिर्वाह केला. मात्र आता रब्बी हंगामातील गव्हाचे पीक ऐन हुरड्यात आले असून उजनीकाठी आश्रयाला आलेल्या स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मोर्चा आता गव्हाच्या पिकाकडे वळवला असून तावडीत सापडलेल्या गव्हाच्या पिकाचा अक्षरशः पक्षी फडशा पाडत आहेत.
आपल्याकडे रब्बी हंगामामध्ये गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र शेतकरी आपापल्या सोयीनुसार खोडवा ऊस गेल्यानंतर व अन्य पीकाचे रान मोकळे झाल्यानंतर गव्हाचे पीक घेत असतात. त्यामुळे एकाच वेळी शिवारात गव्हाचे पीक येत नाही. एकापाठोपाठ एक अशा शेतकऱ्यांच्या जशा पेरण्या झालेल्या आहेत. तशी पिके हुरड्यात येत असल्यामुळे एकाच शेतकऱ्याच्या गव्हाच्या पिकावर पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी बसत असल्यामुळे शेतकरी आता या पक्ष्यांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झाला असून पक्षी हुसकावण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले असल्याचे दिसून येत आहे .
सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या पूर्व भाग हा पारंपारिक पद्धतीने जुन्या काळामध्ये ज्वारीच्या पेरण्याखाली मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामात येत असत. त्यामुळे बरेच पक्षी ज्वारीच्या हुरड्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. ज्वारीच्या पिकाचा हुरडा खाण्यासाठी स्थानिक स्थलांतरित भोरड्या कायम या परिसरामध्ये येत असतात. त्यानंतर कुरकुंजा नावाचा पक्षी करडीच्या हुरड्यासाठी आवर्जून येत असे .मात्र अलीकडच्या काळामध्ये करडईचे पीक जवळपास संपुष्टातच आले आहे .
ज्वारीचे पीकही अगदी नगण्य प्रमाणामध्ये घेतले जाते. शेतकरी खाण्यापुरता गहू आपल्या शेतात घेत असतात . परंतु आता पक्ष्यांनी गव्हाच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा वळवल्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकाची राखण करणे दुरापास्त झाले असून , गव्हाच्या पीकावरील पक्षी हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी ,पक्षी त्यांचा हक्क बजावत आपल्या हक्काचा निसर्गातला पाहुणचार झोपतच असतात .त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होते. ते नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी शेतकरी गव्हाच्या पिकामध्ये बुजगावणे लावणे ,फटाके फोडणे, प्लास्टिकचे कागद वाऱ्याच्या झोतावर फडकवणे ,आदी उपाययोजना करताना आढळून येत आहेत. मात्र पक्षी त्यांचा पाहुणचार झोडपण्यामध्ये अत्यंत पटाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना या पक्ष्यांना आवर घालण्यात अवघड झाले आहे.