पुणे : मेट्रो साहित्याची वाहतूक करणारा २४ ट्रक अवजड ट्रक लक्ष्मी रस्त्यावर विरुद्ध दिशेने शिरला. रस्ता चुकल्याने विरुद्ध दिशेने आलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध थांबल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेची चित्रफीत एका नागरिकाने समाज माध्यमात प्रसारित केली. त्यानंतर विश्रामबाग वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक बाजूला नेण्यास मदत केली. विरुद्ध दिशेने ट्रक नेल्याने (नो एंट्री) पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात (शगुन चौक) सकाळी थांबला होता. सकाळी फारशी वर्दळ रस्त्यावर नव्हती. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली नाही. मेट्रो साहित्याची वाहतूक करणारा २४ चाकी ट्रक मधोमध थांबला होता. रस्ता चुकल्याने ट्रक नेमका कोणत्या दिशेने न्यायचा, याची माहिती नसल्याने ट्रक चालक गोंधळून गेला होता. एका नागरिकाने याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तेथे धाव घेतली.

पोलिसांनी ट्रकचालकाकडे विचारपूस केली. तेव्हा मेट्रोचे साहित्य गणेशखिंड रस्त्यावर उतरवून ट्रक साताऱ्याकडे निघाला होता, मात्र, रस्ता चुकल्याने लक्ष्मी रस्त्याने विरुद्ध दिशेने ट्रक नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ट्रकमधील डिझेल संपत आल्याने ट्रक थांबविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी रस्ता दाखवून मध्यभागातून बाहेर काढले.

बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक शहराच्या मध्यभागातून जातात. अनेक ट्रकचालकांना रस्ता माहिती नसल्याने वाहतूक विस्कळीत होते. भरधाव सिमेंट मिस्कर, अवजड ट्रकमुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. अवजड वाहनांना बंदी आदेशाची माहिती परगावाहून येणाऱ्या ट्रकचालकांना माहिती नसते. नियमभंग करणाऱ्या ट्रकचालकांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मेट्रोचे साहित्य घेऊन २४ चाकी ट्रक गणेशखिंड रस्त्यावर आला होता. शुक्रवारी मध्यरात्री ट्रकमधील साहित्य त्याने उतरविले. रस्ता चुकल्याने त्याने ट्रक लक्ष्मी रस्त्यावरुन विरुद्ध दिशेने नेला. ट्रकमधील डिझेल संपत आल्याने त्याने ट्रक उंबऱ्या गणपती चौकात मधोमध थांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ट्रकचालकाला बाहेर जाण्याचा मार्ग दाखविण्यात आला. सकाळची वेळ असल्याने वाहतूक विस्कळीत झाली नाही. विरुद्ध दिशेने ट्रक नेल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

संगीता जाधव, पोलीस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक शाखा