पुण्यातील मावळ परिसरात झालेल्या गारपिटीमध्ये शेतकरी आणि फूलउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी मावळ परिसरातील काही भागांत जोरदार गारपीट झाली. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना आणि फूलउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. २०२०-२१ मध्येदेखील चक्रीवादळ आल्याने मावळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मावळमधील आंदर मावळ आणि पवना धरण परिसरात जोरदार गारपीट झाली. याचा थेट फटका फूलउत्पादक आणि शेतकऱ्यांना बसला आहे. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, पालेभाज्यांना गारपिटीने झोडपून काढले आहे. गहू, ज्वारी आणि बाजरी पीक हे गारांच्या माऱ्याने आडवे झाले आहे. आधीच सुलतानी आणि अस्मानी संकटांना तोंड देत शेतकरी उत्पन्न घेतो.
हेही वाचा >>> शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
ऐन हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे, असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांना वेळीच नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासकीय स्तरावर तातडीने प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांनीदेखील लवकरात लवकर मदत करावी, असे आवाहन शासनाला केले आहे.
अन्यथा आम्हाला इतर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करावी लागेल
मावळमधील फूलउत्पादक शेतकरी पिंगळे म्हणाले, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फूलउत्पादक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाब आणि इतर फुलांची आम्ही शेती करतो. गुलाबांचे उत्पन्न घेण्यासाठी पॉली हाऊस उभारले जाते. काल झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले आहे. पॉली हाऊसवरील प्लास्टिकचे कापड उडून गेले आहे. याअगोदर २०२०-२१ लादेखील चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान झाले होते. कर्ज काढून आम्ही शेती करतो. गेल्या वेळेस नुकसानभरपाई मिळाली नव्हती. आम्हाला नुकसानभरपाई मिळावी अन्यथा आम्हालादेखील आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
पंचनामे करण्यास आम्ही सुरुवात केली आहे नायब तहसीलदार चाटे म्हणाले, पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज त्याचा आढावा घेऊन किती नुकसान झाले आहे याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार आहोत. शेतकऱ्यांच्या घरांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले आहेत. गारपीट झाली असली तरी जीवितहानी झालेली नाही.