लोणावळ्यातील भुशी धरणावर विकेंड असल्याने पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. आखाड पार्टीच नियोजन आणि विकेंड असल्याने लोणावळ्यात हजारो पर्यटक दाखल झाले होते. सहारा ब्रिज, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. लोणावळ्यासह भुशी धरण आणि टायगर पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या.
लोणावळा पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं. भुशी धरण, लाईन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी पावसाळ्यात मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल होतात. समाधानकारक पाऊस झाल्याने भुशी धरण ओसंडून वाहत आहे. तर इतरही छोटे- मोठे धबधबे वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर हिरवा शालू परिधान केल्याचं भास सध्या होतो, कारण सर्वत्र हिरवळ दिसते. अनेक पर्यटक नियमांचे उल्लंघन करून डोंगर माथ्यावर चढतात. यामुळे पाय घसरून दुर्घटना होण्याची शक्यता असते.
हेही वाचा >>> आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
लोणावळ्यासह भुशी धरण टायगर आणि लायन्स पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. सायंकाळच्या सुमारास सर्व पर्यटक लोणावळ्याच्या दिशेने निघाल्यानंतर वाहतूक कोंडीचे आणखी चित्र विदारक होते. पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत केली असली तरी प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणं अशक्य गोष्ट आहे. पर्यटकांचा वीकेंड आणि आखाड पार्टीचे नियोजन यामुळे लोणावळा पोलिसांची दमछाक झाली.