पुणे/पिंपरी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हा सामना हाऊसफुल्ल असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला ठिकठिकाणी मिळत असलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून, सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक स्पर्धेची तीव्रता आणि राज्यात मराठा आरक्षणाची तीव्रता वाढली असल्याने आंदोलक आपला मोर्चा या सामन्याकडे वळवू शकतात याची भीती लक्षात घेऊन पोलिसांनी जवळपास मैदानाच्या जवळचा सगळाच परिसर ताब्यात घेतला आहे. सामना दुपारी दोन वाजता होणार असून, मैदानाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी दुपारी १२.३० वाजता उघडले जाणार आहेत. सामना दोन तगड्या संघांत असल्यामुळे सामन्याची सर्व तिकिटे संपली आहेत. अशा वेळी मोठी गर्दी होणार यात शंका नाही. त्यामुळे तिकीटधारकांनी लवकरात लवकर वेळेत मैदानावर पोहचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा… पिंपरी : दिघीत टोळक्याची तृतीयपंथीयाला मारहाण

दुपारपर्यंत या आंदोलनाची झळ ठिकठिकाणी पोचत असल्यामुळे संध्याकाळनंतर पोलिसांनी संपूर्ण मैदान ताब्यात घेतले असून, सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस परिस्थिती हाताळत असल्याचे सांगितले.

हेही वाचा… Maharashtra News Live : सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या आमदारांचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

पोलिसांचा ताफा

वाहतुकीच्या नियोजनासाठी एक पोलीस उपायुक्त, मैदान परिसरातील सुरक्षिततेसाठी एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, ७० सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ८०० अंमलदार, एसआरपीच्या तीन टीम असणार आहेत. या पोलीस बंदोबस्तामुळे मैदानाला छावणीचे स्वरूप आले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy police deployed at gahunje cricket stadium for newziland south africa match in the wake of the maratha reservation agitation pune print news ggy 03 asj
Show comments