पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील मध्यभागाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी सकाळपासून वाहतूक बदल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे. त्या भागातील रस्ते टप्याटप्याने बंद करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोदी दर्शन घेणार असून, या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदींचा ताफा मंदिराजवळ थांबणार आहे.

हेही वाचा – नरेंद्र मोदी यांना आज ‘टिळक पुरस्कार’; शरद पवार यांची उपस्थिती, मणिपूरप्रश्नी आंदोलनात राष्ट्रवादीचा सहभाग

हेही वाचा – “पंतप्रधानांनी पुणेऐवजी मणिपूरला जावे”, रविंद्र धंगेकरांचा सल्ला; काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात पोलिसांनी तात्पुरते कठडे उभे केले आहेत. सोमवारपासून चौकाचौकांत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मध्यभागाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मध्यभागातील उंच इमारतींच्या छतांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविणे, निषेधाच्या घोषणा देण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी पदपथावर थांबण्यास मज्जाव केला आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy police deployment in pune on the occasion of pm modi visit pune print news rbk 25 ssb