पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे विदर्भात आणि किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. रत्नागिरी आणि चंद्रपुरात पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. आज (शुक्रवारी) त्याचे ठळक स्वरुपाच्या कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून, ते ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीवर आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपासून केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे विदर्भ आणि किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेशांचा मार्ग मोकळा, निवडयादी, प्रतीक्षा यादी कधी?

हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला लाल इशारा दिला आहे, तर उर्वरित पूर्व विदर्भाला नारंगी इशारा दिला आहे. चंद्रपूरसह पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीवर रत्नागिरीला लाल इशारा तर उर्वरित जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागाला पिवळा इशारा देण्यात आला असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा – पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस, श्रीनाथ भिमालेंची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

लाल इशारा – चंद्रपूर, रत्नागिरी.

नारंगी इशारा – गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, मुंबई, ठाणे.

पिवळा इशारा – पुणे, कोल्हापूर, पालघर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र.