पुणे : किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (१२ जुलै) पुढील तीन दिवस हवामान विभागाने किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा देण्यात आला असून, तिथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – कडधान्य, तेलबियांची विक्रमी पेरणी, सोयाबीन, मका, कापूस, तुरीचा पेरा वाढला
निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, राज्यात मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.